हर्षद कशाळकर

अलिबाग : राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने रायगड जिल्ह्यात मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. संघटनात्मक बांधणी बरोबरच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना प्राधान्य दिले आहे. गुरुवारी अलिबाग येथे झालेल्या कार्यकारणी मेळाव्यात याची प्रचिती आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणूकीत भाजपला सोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यानंतर जिल्ह्यातील शिवसेना संघटनेत मोठी फूट पडली. बहुतांश शिवसेनेच्या नेत्यांनी आमदारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुळ शिवसेना संघटनेची मोठी कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आगामी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाने गुरुवारी अलिबाग येथे कार्यकारणीचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश यावेळी पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना देण्यात आले. या सर्व निवडणूकांमध्ये भाजपला सोबत घेण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात होऊ घातलेल्या २० ग्रामपंचायत निवडणूकापैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकायच्या असल्याचे शिंदे गटाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन तर भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे सात पैकी सहा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपची ताकद आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगर पालिका निवडणूकीत एकत्रित पणे सामोरे जातील असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला. त्याची सुरवात ग्रामपंचायत निवडणूकांपासून करा असे निर्देश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.

हेही वाचा : बारामतीमध्ये आतापर्यंत दोनदा जनता पक्षाला यश, काँग्रेस आणि पवाराचांच पगडा

राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. पक्षनेतृत्वाला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता, म्हणून जनतेचा कौल नाकारून त्यांनी महविकास आघाडी स्थापन केली. तीन आमदार सेनेचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. त्यांनी शिवसेनेचे खच्चीकरण सुरु केले. तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. म्हणून शिवसेनेच्या तिनही आमदारांना उठाव करण्याची वेळ आली असल्याचे यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : कर्नाटक : काँग्रेसच्या प्रचारमोहिमेचा भाजपाने घेतला धसका, ‘ताबडतोब गुन्हा दाखल करा,’ मुख्यमंत्री बोम्मई यांचे निर्देश

तर जिल्ह्यात शेकापची ताकद कमी होत आहे. जिल्ह्यातील राजकीय समिकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षवाढीसाठी शिवसेनेला मोठी संधी त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
एकूणच राज्यातील सत्तासंघर्षानंतर जिल्ह्यात शिंदे गट आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांवर शिंदे गटाने लक्ष केंद्रीत केल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. महत्वाची बाब मतदारसंघातील कार्यकर्ते सोबत राखण्यात शिंदे गट यशस्वी होतांना दिसत आहे. पण मतदार पक्षांतर्गत बंडखोरीकडे कशा नजरेतून बघतात अदांज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतून मिळू शकणार आहे.