देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
राज्यात २७ वर्षे सरकार असतानासुद्धा जेव्हा जवळजवळ ५३ टक्के मते एका पक्षाला पडतात, तेव्हा तो कौल निर्विवाद मानला पाहिजे. हा गुजरातच्या जनतेचा तर विजय आहेच आणि त्याला कारण आहे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टाकलेला विश्वास, त्यांचे मान्य केलेले नेतृत्व, त्यांच्या मान्य केलेल्या क्षमता आणि त्यांचे शाश्वत विकासाचे व्हिजन! नरेंद्र मोदी यांनी गुजरातला विकासाचे एक मॉडेल दिले आणि गुजरातच्या जनतेने ते स्वीकारले. देशाला विकासाचे एक मॉडेल दिले आणि त्यातून देशातील जनतेचा विश्वास त्यांना प्राप्त झाला. म्हणूनच हा विजय विकासाचासुद्धा आहे.
आपला नेता जेव्हा देशाला यशस्वीपणे आकार देऊ पाहतोय, तेव्हा त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहून जनता संदेश देत असते. केवळ गुजरात नव्हे तर तोच संदेश देशाचाही आहे. पण, अर्थातच मोदीजींचे गृहराज्य म्हणून गुजरातने दिलेला संदेश अधिक मौल्यवान आहे. डबल इंजिनची सरकारे असलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यांप्रमाणेच गुजरातेतील लोकांनी शाश्वत विकास पाहिला आहे. आज देशात ज्या गरीब कल्याणाच्या किंवा मूलभूत गरजांच्या योजना राबविल्या जात आहेत, त्याची शंभर टक्के अंमलबजावणी पाहिली आहे. घरोघरी दिलेले नळ असोत, महाविद्यालये, विद्यापीठांची संख्या असो, विजेच्या बाबतीत स्वयंपूर्णतेतून ‘सरप्लस’ची वाटचाल असो, महिलांचा सन्मान वाढविणाऱ्या योजना असोत, गुजरातमध्ये भक्कमपणे योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. गुजरातकडे साधारणत: व्यावसायिकांचे राज्य म्हणून पाहिले जाते. असा एक कल असायचा की, पिढीजात व्यवसाय सांभाळणाऱ्यांची संख्या मोठी असायची. पण, भाजप सरकारच्या काळात शिक्षण सोडून देणाऱ्यांची संख्या ३७ टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आली. म्हणजे शिक्षणालाही तितकेच प्राधान्य देण्यात आले.
खेळाच्या दृष्टीने उभारलेल्या सुविधा असोत की, गुजरातचे वैभव जपण्यासाठी तेथील सरकारने केलेले प्रयत्न असोत, सर्वच क्षेत्रांत बदल घडत असताना जेव्हा जनता आपल्या भविष्याप्रति आश्वस्त असते, तेव्हाच असे परिणाम येतात. म्हणूनच गुजरातमधील हा विजय भव्य आहे. अलीकडच्या कालावधीत राजकीय विश्लेषक आपल्या आकलनात चुकताना दिसत आहेत. त्यामुळेच गुजरातच्या विजयाबाबत संभ्रम निर्माण केले गेले. विजय मिळाला तरी तो इतका भव्य नसेल, अशा वावडय़ा उठविल्या गेल्या. हीच चूक २०१९च्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा विश्लेषकांनी केली होती. काहींनी ती नंतरच्या काळात मान्य केली. पण, काही अजूनही त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. असो, तो त्यांचा प्रश्न आहे.
पण, जेव्हा योजना घराघरांमध्ये पोहोचतात, त्याचे लाभ थेट बँक खात्यात मिळतात, त्यासाठी मध्ये कुणी दलाल नसतो, तेव्हा जनतेलाही परिवर्तन दिसत असते आणि त्या परिवर्तनाच्या प्रक्रियेला पावती देण्याचीच भूमिका मतदार वठवीत असतात. आपल्या लोकशाहीचे हेच सौंदर्य आहे. गुजरातच्या जवळपास ११ मतदारसंघांत मी प्रचारासाठी गेलो होतो. आमचे नेते अमितभाई शहा सातत्याने सांगायचे, या वेळी भाजप गुजरातेत पराक्रम करणार. ते असे का सांगायचे, हे मी या मतदारसंघांमध्ये अनुभवत होतो. जनता आश्वस्त होती. गुजरातमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन! गुजरातचा विजय कसा असेल, याचे अचूक पूर्वानुमान करणाऱ्या अमितभाईंचेही खूप खूप अभिनंदन. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात आम्हा सर्व कार्यकर्त्यांना असे नेते लाभले, याचा मोठा अभिमान वाटतो. गुजरातच्या जनतेचेही मी आभार मानतो, कारण त्यांनी दिलेला हा भक्कम कौल, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भव्य विजयाचा भक्कम पाया ठरणार आहे.