मालेगाव – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करीत शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अजित पवार यांच्या गटाला नाशिक जिल्ह्यातून पक्षाच्या सर्वच्या सर्व सहा आमदारांची भरभक्कम अशी साथ मिळाली असली तरी मालेगावातील बहुसंख्य पदाधिकारी, पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचीच पाठराखण केली आहे. पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठ फिरविण्याची भूमिका घेतल्याने मालेगावात अजितदादा गट काहीसा दुबळा असल्याचे चित्र आहे. ही नामुष्की न परवडणारी असल्याने राज्यात सत्ताधारी असलेल्या दादा गटातर्फे पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी येथे धडपड सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी मैलाचा दगड ठरलेल्या फलोत्पादनसारखी योजना सुरू करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग मालेगाव परिसरात अस्तित्वात आहे. कामाचा उरक आणि प्रशासनावरील वचक या गुणवैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांच्याशीही अनेकांचे चांगले संबंध आहेत. दीड वर्षापूर्वी रशीद शेख आणि आसिफ शेख हे मालेगाव बाह्यचे माजी आमदार असलेले पिता-पुत्र तत्कालीन महापौर आणि तब्बल २७ नगरसेवकांसह काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे काँग्रेसकडे असलेली महापालिकेतील सत्ता राष्ट्रवादीला आयतीच मिळाली होती. काँग्रेसचे तत्कालीन महानगरप्रमुख असलेल्या आसिफ शेख यांच्याकडे पक्षप्रवेशानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. याचा परिणाम मालेगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा वाढण्यात झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघात विजय मिळविण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याची खात्री निर्माण झाली. तेव्हाचा हा घाऊक पक्षप्रवेश तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांच्या माध्यमातूनच घडून आला होता. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडवून आणणे आणि त्यानंतर शिंदे-फडणवीस गटात नऊ सहकाऱ्यांसह अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेणे हे बहुसंख्य कार्यकर्त्यांना रुचलेले दिसत नाही. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील पक्षाचे जवळपास सर्व पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते शरद पवार गटाबरोबर असल्याचे अधोरेखित होत आहे.
हेही वाचा – समान नागरी कायदा आता २०२४ नंतर; तोपर्यंत चर्चेतून वातावरण निर्मिती सुरू राहणार
मालेगाव तालुक्यात मध्य आणि बाह्य असे विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. याशिवाय तालुक्यातील ५२ गावे नांदगाव मतदारसंघात समाविष्ट आहेत. मालेगाव मध्य हा मुस्लीम बहुसंख्यांक मतदारसंघ आहे. बदलत्या समीकरणात अजित पवार यांचे भाजपच्या वळचणीला जाणे, हे शहरातील मुस्लीम समुदायाला पसंत पडणे बिलकूल शक्य नाही. त्यामुळे ‘सख्य’ असले तरी स्थानिक संदर्भ लक्षात घेता अजित पवार यांचे समर्थन करणे राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख आसिफ शेख यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणारे आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडानंतरही मालेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीच पडझड झालेली नाही. मालेगावचा ग्रामीण भाग असलेल्या विधानसभेच्या बाह्य मतदारसंघातही जवळपास अशीच स्थिती आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले, प्रदेश पातळीवरील पदाधिकारी विनोद चव्हाण, दिनेश ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष विजय दशपुते अशा सर्व मंडळींनी शरद पवारांचीच पाठराखण केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या उपस्थितीत येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नव्या जोमाने पक्ष संघटन मजबुत करण्याचा निर्धारही या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीची दोन गटांत विभागणी झाल्यानंतर सध्या तालुक्यात दादा गटासोबत गेलेले डाॅ. जयंत पवार हे एकमेव मोठे नाव आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा प्रभाव असलेल्या नांदगाव मतदारसंघातील ५२ गावांमधील स्थिती मात्र थोडी वेगळी आहे. तेथे तुलनेने दादा गटाला बरे समर्थन लाभल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या गटाने मालेगाव शहर व तालुका भागात पक्ष संघटना उभी करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
अजित पवार गटाचे ॲड. रवींद्र पगार यांना पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची पुन्हा संधी मिळाली आहे. पगार यांच्या उपस्थितीत लवकरच येथे दादा गटाची बैठक होणार आहे. जनमानसात नावलौकिक असणाऱ्या व पक्ष विस्तारासाठी उपयुक्त ठरेल, अशा व्यक्तीची तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यासाठी या गटाने चाचपणी सुरू केली आहे. याशिवाय मालेगाव मध्य मतदारसंघात समर्थन मिळविण्यासाठीही दादा गटाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यात कितपत यश मिळेल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. असे असले तरी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख आसिफ शेख यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात मुस्लीम मुलींच्या विवाहासाठी शासनाने शादी मुबारक नावाची योजना सुरू करून ५१ हजारांची आर्थिक मदत द्यावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी ही भेट घेतल्याचा शेख यांचा दावा आहे. ते काहीही असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत सध्या रस्सीखेच सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली आहे.