नागपूर: राज्याची राजधानी मुंबईकडे सत्ताकेंद्र म्हणून बघितले जात असले तरी उपराजधानी नागपूरही यात मागे नाही. राज्यातील दोन प्रमुख प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष भाजप व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांच्यासह भाजपचे दोन प्रभावी नेते अनुक्रमे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांची निवासस्थाने नागपुरात असल्याने राज्याच्या राजकीय घडामोडींचे नागपूर हे महत्वाचे केंद्र ठरले आहे.
दहा वर्षांपूर्वी केंद्रात आणि राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना दिल्ली हे देशाच्या राजकारणाचे तर मुंबई राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिदू होते. राज्यात मुंबईनंतर पुण्याचा क्रम होता. २०१४ मध्ये केंद्र व राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यावर दिल्लीचे महत्त्व अबाधित राहिले असले तरी राज्याच्या राजकारणात नागपूर हे दुसरे सत्ताकेंद्र म्हणून पुढे आले. त्याला कारण ठरले नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री होणे व केंद्रात नितीन गडकरी यांना मंत्रिपद मिळणे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक केंद्र व राज्य शासनाशी संबंधित महत्त्वाच्या बैठका, राजकीय मेळावे मुंबई-पुण्याऐवजी नागपुरात होत असत. २०१९ नंतर राज्यात महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या सत्ताकाळात याला थोडा खंड पडला. पण काँग्रेसने वैदर्भीय नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याने व त्यांचे निवासस्थान नागपुरातच असल्याने काँग्रेसच्याही राज्यपातळीवरील महत्त्वाच्या बैठका नागपूरमध्ये सुरू झाल्या.
हेही वाचा… शरद पवार कोल्हापूरमध्ये कोणती भूमिका मांडणार? छत्रपती शाहू महाराज सभेच्या अध्यक्षस्थानी
पटोलेंना शह देण्यासाठी भाजपनेही नागपूरकर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळे दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नागपूरकर झाले. अनेकदा दोन्ही नेत्यांचे एकाच दिवशी नागपुरात कार्यक्रम होतात. विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त झालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ जरी चंद्रपूर जिल्ह्यात असला तरी त्यांचेही घर नागपुरातच आहे. त्यांची दर आठवड्याला येथे भेट ठरलेली आहे. तेही येथेच बैठका, पत्रकार परिषद घेतात. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचेही निवासस्थान शहरातच आहे. त्यामुळे शनिवार-रविवार हे दोन दिवस नागपुरात राजकीय नेत्यांच्या दौऱ्याची रेलचेल असते. राज्याच्या विविध भागातील दोन्ही पक्षाचे नेते वरील नेत्यांना भेटण्यासाठी नागपुरात येतात. पूर्वी प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी स्थानिक नेत्यांना मुंबईत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
हेही वाचा… उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिंदे गटाकडून कावड यात्रेची फलकबाजी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक कार्यालय त्यांच्या गोकुळपेठेतील निवासस्थान व दुसरे कार्यालय त्यांच्या येथील शासकीय निवासस्थानी (देवगिरी) आहे. उपलब्धवेळेनुरूप काही बैठकी शासकीय निवासस्थानी तर काही त्यांच्या खासगी निवासस्थानी होतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनेक शासकीय बैठका त्यांच्या निवासस्थानीच घेतात. यांचा जनसंपर्क कार्यक्रम त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात नियमितपणे रविवारी आयोजित केला जातो.