नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षनाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याविरोधात शरद पवार गटाने दिलेल्या आव्हानावर दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करावे, असे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अजित पवार गटाला दिले. यासंदर्भातील पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा दिला होता व घड्याळ हे निवडणूक चिन्ह बहाल केले होते. त्याविरोधात शरद पवार गटाने आव्हान दिले आहे. यासंदर्भात मंगळवारी न्या. सूर्यकांत व न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाने दोन आठवड्यांमध्ये न्यायालयात उत्तर सादर केल्यानंतर शरद पवार गटाने एक आठवड्यामध्ये प्रत्युत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>>दोन आठवड्यांत उत्तर सादर करा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला उत्तर सादर करण्यास सांगून चार महिने होऊन गेले तरी, त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. न्यायालयाने दिलेली मुदतही उलटून गेली आहे. हा मुद्दा शरद पवार गटाच्या वतीने खंडपीठासमोर मांडण्यात आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

चिन्हावरूनही धाव

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार हे पक्षनाव व माणसाच्या हातातील तुतारी हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. शिवाय, या पक्षनावाने देणगी घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये अन्य उमेदवारांना तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. त्याविरोधातही शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आक्षेपाची न्यायालयाने दखल घेतली आहे.

Live Updates