वर्धा : विधानसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळवण्यात आमदार डॉ. पंकज भोयर व समीर कुणावार यशस्वी ठरले असून आर्वीचे दादाराव केचे यांच्यावर टांगती तलवार असल्याचे दिसून येते.
देवळी मतदारसंघ सेनेकडून खेचण्यात भाजपला यश आले असून या ठिकाणी अपेक्षित राजेश बकाने यांना उमेदवारी मिळाली. गेल्यावर्षी या ठिकाणी सेनेचा उमेदवार होता. यावेळी सेनेने हट्ट धरला होता. नेत्यांनी चाचपणी केली. मात्र, चारही जागा भाजपच लढणार, हा निर्धार खरा ठरवण्यात जिल्हा नेत्यांना यश आले आहे. बकाने गेल्या निवडणुकीत अपक्ष लढत दुसऱ्या क्रमांकावर तर सेनेचे समीर देशमुख तिसऱ्या क्रमांकावर होते. ही जागा त्यापूर्वी भाजपकडेच होती.
आणखी वाचा-बबनराव लोणीकर यांना सलग आठव्यांदा उमेदवारी
हिंगणघाट येथे कुणावार यांना पक्षातून स्पर्धाच नव्हती. त्यामुळे ते आता तिसऱ्यांदा मैदानात उतरणार. वर्ध्यातून आमदार भोयर यांनी पक्षांतर्गत तटबंदी मजबूत केली होती. विरोध संपुष्टात आणला. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भोयर यांना भक्कम पाठिंबा राहिला. निवडणूक कौशल्य यात अखेर ते बाजी मारून गेले.
आर्वी हा मतदारसंघ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र पुढे आले आहे. कारण, विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. पहिल्या यादीत नसल्याने केचे समर्थक धास्तावल्याचे दिसून आले. दुसऱ्या यादीत माझे नाव १०० टक्के असेल, असा विश्वास केचे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येथे केचे की वानखेडे, याभोवती चर्चा फिरत आहे.