चंद्रपूर : जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार भाजपचे निवडून आल्यानंतरही पक्षांतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे मंत्रिपद हुकले. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील विकासकामांवर होण्याची शक्यता आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील चढाओढही यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही गटबाजी असून ती उघडपणे समोर आली आहे. भाजप नेते एकमेकांना पाण्यात पाहतात. याचा प्रत्यय मंत्रिमंडळ शपथविधीत आला. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपला येथे घवघवीत यश मिळाले. यामुळे जिल्ह्याला कॅबिनेट आणि राज्यमंत्री, अशी दोन मंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा होती. मात्र, नेत्यांच्या आपसातील भांडणात एकही मंत्रिपद मिळाले नाही. मुनगंटीवार बल्लारपुरातून सलग सातव्यांदा आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. मुनगंटीवार यांच्याशिवाय मंत्रिमंडळ, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. परंतु पहिल्यांदाच त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले. यातून जिल्ह्यातील इतर आमदारांसह नेत्यांशी जुळवून घ्या, असा संदेश पक्षाने त्यांना दिल्याचे बोलले जाते. ब्रिजभूषण पाझारेंची बंडखोरी यासाठी कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे.

हेही वाचा – राज्याला पहिले उपमुख्यमंत्री देणारा भंडारा जिल्हा मंत्रिपदापासून वंचितच!

u

मंत्रिपद हुकल्याने मुनगंटीवार यांचे समर्थक नाराज आहेत, तर अहीर समर्थक आनंदी आहेत. नेत्यांच्या या भांडणात जिल्ह्याचे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांमधून उमटत आहे. विकासाची दृष्टी केवळ मुनगंटीवार यांच्यात आहे आणि तेच मंत्रिमंडळात नाही, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वाला जातील की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

हेही वाचा – ‘सरकार प्रत्येक विषयावर चर्चेसाठी तयार’; विरोधकांनी राजकारण न करण्याचा फडणवीसांचा सल्ला

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशात मुनगंटीवार यांचे अमूल्य योगदान आहे. आता पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवतात, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar minister post chandrapur development bjp devendra fadnavis cabinet print politics news ssb