चंद्रशेखर बोबडे
नागपूर: शिंदे – भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर रविवारी झाले. आता त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. फडणवीस सरकारमध्ये सरस कामगिरी करणारे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खाते मिळाले नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.
सुधीर मुनगंटीवार भाजपचे विदर्भातील प्रमुख नेते आहेत. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी अर्थ आणि वन या दोन प्रमुख खात्यांची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. भाजप- शिंदे गट युती सरकाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा शपथ घेणा-या मंत्र्यांच्या यादीत मुनगंटीवार यांचा दुसरा क्रमांक होता. या बाबी मुनगंटीवार यांचे ज्येष्ठत्व आणि अनुभव अधोरेखित करतात. त्यामुळे यावेळी मंत्री झाल्यावर त्यांना महसूल, अर्थ यासारखे एखादे महत्त्वाचे खाते मिळेल, अशी अपेक्षा होती. पण महसूल खाते दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे यांना देण्यात आले व मुनगंटीवार यांच्याकडे जुनेच वन खाते व सांस्कृतिक खाते ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती देण्यात आली. पर्यावरणीय बदल हे खाते शिंदे गटाला देण्यात आले. त्यामुळे मुनगंटीवार यांच्यावर अन्याय झाल्याची समर्थकांची भावना आहे.
हेही वाचा… सत्तापरिवर्तन होताच अकोल्यात पक्षांतराचे वारे
मात्र याबाबत मुनगंटीवार यांनी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. खाते मोठे किंवा छोटे नसते. जे मिळाले त्याला आपले माणून काम करण्याची आपली भूमिका आहे. वनखात्याची व्याप्ती मोठी आहे.राज्यात एकूण ५० विभाग आहेत. यावरून या खात्याचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाही,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुनगंटीवार यांना ऊर्जा खाते देऊ करण्यात आले होते. पण ते त्यांनी नाकारले.