Kishor Jorgewar BJP Joining चंद्रपूर : भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) असा दहा वर्षांचा राजकीय प्रवास केलेल्या अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी दिल्ली गाठली आहे. मात्र, जोरगेवार यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध दर्शविला आहे. संभाव्य उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांना सोबत घेऊन मुनगंटीवार दिल्लीत दाखल झाले आहेत. पाझारे या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, अशी मागणी दिल्लीतील केंद्रीय नेत्यांना त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक अपक्ष आमदार जोरगेवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या गदारोळानंतर आता भाजपमध्येही खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने जोरगेवार आता भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी चंद्रपुरातील नेत्याच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांची मदत घेतली आहे. त्यांच्या मदतीने ते दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. यामुळे  मुनगंटीवार गटात अस्वस्थता वाढली आहे. या जागेसाठी मुनगंटीवार हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी मुनगंटीवार आज सकाळी काही समर्थकांसह दिल्लीला रवाना झाले. त्यांच्यासोबत पाझारे आणि राजुरा येथील भाजपचे इच्छुक उमेदवार देवराव भोंगळे आहेत.

हेही वाचा >>>महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू शकते का? संजय राऊतांच्या दाव्यात किती तथ्य? नियम काय सांगतो?

 जोरगेवार यांचा दिल्लीतील संभाव्य भाजप प्रवेश रोखण्यासाठीच ते घाईघाईने दिल्लीला रवाना झाल्याचे बोलले जाते. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार यांनी राजकीय कारणासाठी दिल्लीला जात असल्याचे स्पष्टपणे सांगितले. गेल्या १० वर्षात पाच राजकीय पक्षात प्रवास केलेल्या व्यक्तीला तिकीट देण्याचा प्रयत्न पक्ष करत असेल तर तो भाजपतील सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय आहे. अपवादात्मक परिस्थितीत पक्षात आयात केलेल्या उमेदवाराचे आगमन एकदाचे समजू शकतो, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाची स्थिती मजबूत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची कमतरता नाही, अशा परिस्थितीत पक्षाने आयात उमेदवाराला तिकीट देऊ नये. कोणताही आयात उमेदवार देणे योग्य नाही. जोरगेवार यांना चंद्रपूरमधून पक्षाचे तिकीट मिळू देणार नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

 मुनगंटीवारांच्या या तिखट प्रतिक्रियेनंतर आता जोरगेवार यांच्या उमेदवारीबाबत भाजपमध्ये संघर्ष निश्चित मानला जात आहे. हा संघर्ष पुढे कोणती दिशा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwars opposition to kishor jorgewar entry into the bjp print politics news amy