Umred Assembly Election 2024 – काँग्रेसचा राजीनामा देऊन शिंदेच्या शिवसेनेत गेलेले राजू पारवे रामटेक लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. पण उमरेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा पारवे यांना होती. पण या जागेवर शेवटच्या क्षणी भाजपने माजी आमदार सुधीर पारवे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राजू पारवे यांची अवस्था ‘ तेल ही गेले आणि तुपही ..’ अशी झाली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमरेड राखीव मतदारसंघातून राजू पारवे कॉंग्रेसचे उमेदवार होते व त्यांनी भाजपचे सुधीर पारवे यांना पराभूत करून ही जागा दहा वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते रामटेक लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून लढणार अशी चर्चा होती. तशी तयारीही राजू पारवे यांनी सुरू केली होती. पण ऐनवेळी ही जागा भाजपऐवजी शिंदे गटाला गेली. त्यामुळे पारवे यांनी काँग्रेसचा त्याग करून शिंदे सेनेत प्रवेश करून लोकसभा निवडणूक जिंकली. पण त्यात ते पराभूत झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमरेडची जागा शिंदे गटासाठी सोडली जाईल व तेथून पुन्हा राजू पारवे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. महायुतीत या जागेवरचा उमेदवारही शेवटच्या दिवसापर्यंत जाहीर केला नव्हता. अखेर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी भाजपने या जागेवर सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. त्यामुळे पारवे यांच्या हाती काहीच लागले नाही. २००९ आणि २०२४ मध्ये या मतदारसंघातून सुधीर पारवे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.
हेही वाचा – राजुऱ्यात तीन कुणबी उमेदवारांमध्ये लढत, कोण बाजी मारणार?
राजू पारवे यांनी काँग्रेस का सोडली
चार वर्षे काँग्रेसचे उमरेडचे आमदार म्हणून राजू पारवे यांचे काम सुरू असताना त्यांना लोकसभेची निवडणूकीच्यावेळी त्यांना खासदार होण्याची इच्छा बळावली आणि त्यांना भाजपने रांमटेकमधून उमेदवारी देण्याचा शब्द दिला. रामटेक लोकसभा भाजपला मिळावा त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे राजू पारवे शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यांचा शिंदेच्या शिवेसेनेत प्रवेश झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना रामटेक मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे नेते व व स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी चांगलाच प्रचार केला. मात्र त्यांच प्रतिस्पर्धी उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी त्यांना निवडणुकीत पराभत केले. राजू पारवे यांना आपल्याच उमरेड विधानसभा मतदार संघात मताधिक्य घेता आले नाही.