दयानंद लिपारे
नामदेव जाधव या बीडमधील ऊस उत्पादकाची आत्महत्या, अकोले तालुक्यातील प्रवीण कचरू आहेर या शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून संपवलेली जीवनयात्रा, बीडमधीलच शिवाजी गोंडे या शेतकऱ्याने नैराश्यातून दीड एकर पेटवून दिलेला शिल्लक ऊस… या आणि अशा घटनांनी सध्या महाराष्ट्राचा ग्रामीण भाग राजकीयदृष्ट्या अशांत होऊ लागला आहे. आता तर या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी विसर्जनाचे कार्यक्रम आणि त्यावेळी शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून सरकारविरोधी निदर्शने सुरू झाली असून यातून हा प्रश्न राजकीय दिशेने जाऊ लागला आहे.
शेतकरी आत्महत्या हा तसा महाराष्ट्राला नवा विषय नाही. परंतु आजपर्यंत या आत्महत्या दुष्काळी पट्ट्यात प्रामुख्याने होत होत्या. मात्र यंदा राज्यात उसाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे गाळपाविना नुकसान झालेल्या ऊस उत्पादकांच्या बाबतीतही या घटना दिसू लागल्या आहेत. यंदा राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. १३५ लाख टन उसाचे गाळप होऊनही अद्याप साखर कारखाने सुरू आहेत. दुसरीकडे यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे तोडणीसाठी हातात अत्यंत कमी कालावधी उरला आहे. मात्र अद्यापही सुमारे १५ ते २० लाख टन गाळपाच्या प्रतीक्षेत शेतात उभा आहे. वाढते ऊन आणि मजुरांची कमी होणारी श्रमक्षमता आणि उंबऱ्यापर्यंत आलेला पाऊस यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. यातूनच आत्महत्या, आत्महत्येचा इशारा, ऊस पेटवून देणे या सारख्या घटना घडू लागल्या आहेत.
बीडमधील जाधव यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडल्यावर हा प्रश्न अधिकच संवेदनशील बनला आहे. ही घटना कुठे शांत होत नाही तो आणखी एक ऊस उत्पादकाची आत्महत्या घडली. उसाचे उभे फड पेटवण्याचे प्रकार सुरू झाले. या साऱ्यातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सरकारविरोधात असंतोषाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. यात भर पडली आहे, ती स्वर्गीय जाधव यांच्या अस्थींचे जागोजागी सुरू झालेल्या विसर्जन कार्यक्रमांची. शेतकरी संघटनांकडून आयोजित या कार्यक्रमावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सरकारचा निषेध करत आहेत. कराड येथील प्रीतिसंगमावर अशाच झालेल्या कार्यक्रमास राज्यातील सर्वच शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी महाविकास आघाडी शासनावर टीकेची मोठी झोड उठवली गेली.
याच मुद्द्यावर आता राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी देखील सरकारविरोधात रान उठवायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, की अतिरिक्त ऊस असल्याचे अगोदरच लक्षात येऊनही राज्य शासनाने काहीही पावले उचलली नाहीत. आता शेवटच्या टप्प्यात उगाच देखावा करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून येणार नाही. ही महाविकास आघाडी शेतकरीविरोधी आहे, हे सतत सिद्ध होत आहे. हे शासन आणखी किती शेतकऱ्यांचे मुडदे पाडणार आहे, असा संतप्त सवालही त्यांनी केला. तर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरताना या शासनाच्या निष्ठुर व्यवस्थेने नामदेवची राख केल्याचे टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की नामदेव नावाचा शेतकरी मरण पावला हे कळवल्यानंतरही जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना भेट द्यायला वेळ नाही. तर राज्य शासनाच्या धोरणांमुळेच ऊस उत्पादकांवर आत्महत्येची वेळ आल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केलीय. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनीही आघाडी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे ऊस उत्पादकांवर ही वेळ आल्याचे सांगत याला महाविकास आघाडीच जबाबदार असल्याची टीका केली आहे. एकीकडे गाळपाविना शिल्लक ऊस, त्यातून घडलेल्या आत्महत्या, ऊस पेटवण्याच्या घटनांनी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग अशांत असताना आता त्यातच राज्यातील सर्वच शेतकरी संघटनांनी याबद्दल महाविकास आघाडीला धारेवर धरत रान उठवल्याने हा प्रश्न आता केवळ शेती व त्यातील आर्थिक संकटापुरता मर्यादित न राहता तो राजकीय दिशेने जात आहे.