यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रंजक लढती होणार आहेत. अशीच एक रंजक लढत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय, अशी लढत पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रति माझं कर्तव्य म्हणून मी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुनेत्रा पवार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सध्याच्या राजकीय परिस्थितीत माझ्या पतीच्या बाजूनं उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवीत आहे आणि मला विश्वास आहे की, या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ,” असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना पक्षातील जवळ जवळ ८० टक्के नेते-कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला. मतदारांचाही त्यांना पाठिंबा असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यांना हे माहीत होतं की, हा निर्णय देशाच्या भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी आहे.

सासर आणि माहेरचा राजकीय वारसा

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, त्यांना निवडणूक लढविण्याचा कोणताही अनुभव नाही. परंतु, त्यांच्या पतीसह कुटुंबातील इतर सदस्यांनी निवडणूक लढवल्या, तेव्हा प्रचारादरम्यान त्यादेखील सक्रिय होत्या. “माझा भाऊ आणि इतर लोक दीर्घकाळापासून राजकारणात असल्यामुळे माझ्याकडेही राजकारणाची पार्श्वभूमी आहे. माझ्या कुटुंबातील काही सदस्य प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार करीत आहेत, हे खरे आहे; पण माझ्या पतीच्या कुटुंबातील अनेक सदस्य, तसेच माझ्या पालकांच्या कुटुंबातील नातेवाइकांनी माझा प्रचार सुरू केला आहे,” असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?

मुले पार्थ आणि जयबद्दल बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “सध्या दोघेही कार्यालयातून निवडणुकीची कामे हाताळत आहेत. संपूर्ण कुटुंब मैदानात येऊ शकत नाही. कुणाला तरी मागे राहून इतर गोष्टी सांभाळाव्या लागतील. मुलं स्वतःचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असतात आणि ते जे काही निर्णय घेतील, त्याबद्दल पालक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू.”

“बारामतीची लढाई कौटुंबिक नाही”

बारामती मतदारसंघाची निवडणूक म्हणजे कौटुंबिक वाद, अशी चर्चा होत असताना, सुनेत्रा पवार यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. “कुटुंब त्याच्या जागी आहे आणि ते जसं आहे तसंच राहील. माझा पक्ष आणि माझ्या प्रतिस्पर्ध्यांसाठी निवडणूक हा भाग वेगळा आहे. ही निवडणूक कौटुंबिक नाही,” असे त्या म्हणाल्या. त्यांना मिळालेल्या उमेदवारीने बारामतीतील अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, हे त्यांनी मान्य केले आणि मतदारांना भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी केले

राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल अजित पवारांवर कुटुंबातूनच निशाणा साधला जात आहे. त्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, हा राजकीय निर्णय होता आणि असे निर्णय यापूर्वीही अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांनी घेतले होते. “त्यामुळे माझ्या पतीनं देशाच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयावर टीका होऊ नये,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

बारामतीतील प्रमुख समस्या सोडविण्याचा प्रयत्न

पाणीटंचाई आणि बेरोजगारी या बारामती मतदारसंघातील प्रमुख समस्या आहेत. या दोन गोष्टींवर अधिक मेहनत घेणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. “बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे. परंतु, बारामती लोकसभा मतदारसंघातील इतर शहरे व तालुक्यांमध्येही हा विकास दिसायला हवा. मतदारसंघात विकासकामांना भरपूर वाव आहे. मतदारसंघात अनेक किल्ले, तसेच ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आहेत; जेथे पर्यटनाला चालना मिळू शकते. त्यामुळे नागरिकांना रोजगारही उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. मी लोकसभेवर निवडून आल्यानंतर विकासकामांसाठी केंद्र, राज्य व जिल्हा यांच्यात समन्वय ठेवेन, असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, मी नेहमीच सामाजिक कार्यात गुंतलेली असते आणि निवडून आल्यास अधिक जोमाने सामाजिक कार्य करीन.

हेही वाचा : महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

सुनेत्रा पवार म्हणल्या की, एनडीएमधील भागीदारांच्या पाठिंब्यामुळे त्या निवडणूक जिंकतील. कारण- एनडीएतील प्रत्येक जण कठोर परिश्रम घेत आहे. पुणे जिल्ह्यातील एनडीएच्या सर्व उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक रॅली होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या निवडणूक रॅलीचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunetra pawar contesting ls poll baramati interview rac