पीटीआय, पडक्कल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील विशिष्ट जातींचा विदा गोळा करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनुकूल असल्याचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. मात्र या माहितीचा उपयोग राजकारणासाठी न करता त्या समाजांच्या विकासासाठी केला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संघाच्या येथील तीन दिवसांची राष्ट्रीय समन्वय बैठकीचा समारोप सोमवारी झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेकर यांनी अनेक मुद्द्यांवर संघाची भूमिका स्पष्ट केली. हिंदू समाजामध्ये जाती आणि जातीय समीकरणे हा अतिशय नाजूक विषय आहे. मात्र देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तो महत्त्वाचाही आहे. त्यामुळेच हा विषय गांभीर्याने हाताळला पाहिजे आणि केवळ निवडणुकीच्या राजकारणाचा आधार होऊ नये, असे आंबेकर म्हणाले. विरोधी पक्ष जातीनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संघाची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा >>>नांदेड पोटनिवडणूक लढण्यास प्रताप चिखलीकर पुन्हा इच्छुक

महिलांवरील अत्याचारांवर चर्चा

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येसह देशभरातील महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे आंबेकर यांनी सांगितले. पीडित महिलांना लवकरात लवकर आणि योग्य न्याय मिळावा, यासाठी कायद्यांचा फेरआढावा घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कोलकाता येथील घटना दुर्दैवी असून प्रत्येक जण चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका, अन्य यंत्रणा, कायदे आणि न्यायप्रक्रिया यावर सविस्तर चर्चा झाल्याचे आंबेकर यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची चिंता

बांगलादेशात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर तेथील हिंदू समाजाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने तेथील सरकारबरोबर संवाद करावा, असे आवाहन संघाने केले आहे. समन्वय बैठकीत विविध संघटनांनी बांगलादेशातील परिस्थितीची माहिती देणारे सादरीकरण केले. हा अतिशय नाजूक विषय असून सर्वांनाच तेथील हिंदू तसेच अन्य अल्पसंख्य समाजाची काळजी आहे, असे आंबेकर म्हणाले.

सर्वांचे कल्याण व्हावे… जे मागे आहेत, त्या समुदाय किंवा जातींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे संघाचे मत आहे. त्यासाठी सरकारला आकडे लागणार. ही सार्वत्रिक पद्धत आहे. असे आकडे पूर्वी घेतले आहेत, तरी पुन्हा गोळा करायला काय हरकत आहे?सुनील आंबेकरअखिल भारतीय प्रचारप्रमुख, रा. स्व. संघ

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil ambekar clarified that the rashtriya swayamsevak sangh is in favor of conducting a caste wise census print politics news amy