राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक व भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची खात्रीलायक माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. यासंदर्भात भाजपचे केंद्रीय नेतृत्वही गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते.
पुणे लोकसभा मतदारसंघातील तत्कालीन खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमी असली तरी, संभाव्य उमेदवारासाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे.
भाजपच्या कसबा पेठेतील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करून जबरदस्त धक्का दिला होता. कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, तिथून गिरीश बापट सलग पाचवेळा विधानसभेवर निवडून गेले होते. २८ वर्षे भाजपकडे राहिलेला हा मतदारसंघ गमावल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार निवडीबाबत भाजपकडून अधिक दक्षता घेतली जात आहे. या मतदारसंघातून भाजपकडून ब्राह्मण उमेदवार दिला जाण्याची शक्यता जास्त असल्याने देवधर यांचे नाव चर्चेत आल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात, सुनील देवधर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.
भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या फेररचनेमध्ये देवधर यांना स्थान मिळाले नाही. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असलेल्या नेत्यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला नसल्याचे सांगितले जाते. देवधर यांना केंद्रीय नेतृत्वाने पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करण्याची सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे.
हेही वाचा – आघाड्यांचा आजवरचा इतिहास काय सांगतो?
केंद्रीयमंत्री व पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सुनील देवधर यांच्याकडे त्रिपुराची जबाबदारी सोपवली होती. दोन दशकांची डाव्यांची सत्ता खेचून घेण्यात देवधर यांच्या कुशल राजकीय आखणीमुळे भाजपला यश आले. त्यांच्या राजकीय व्यवस्थापकीय कौशल्याचे भाजपमध्येच नव्हे तर, अन्य पक्षांतही कौतुक झाले होते. देवधरांना तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या चमूत स्थान देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी देवधर यांनी पार पाडली होती. भाजपसाठी संघटनात्मक आव्हान असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये देवधर सध्या कार्यरत आहेत.