प्रशांत देशमुख
पालकमंत्री सुनील केदार जिल्ह्यात कमालीचे सक्रीय झाले आहेत. पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर केदार यांनी प्रशासकीय जबाबदारी पार पाडतानाच काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी उपक्रमांचा धडाकाच लावला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत वर्धेतून केदारांच्या नावाचा काँग्रेसतर्फे विचार होत असल्याची चर्चा सुरू असतानाच केदारांनीही अप्रत्यक्षपणे त्यासाठी धडपड सुरू केल्याचे स्पष्ट जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर अन्य पक्षातील नव्या नियुक्त्यांकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
काय घडले-बिघडले?
विविध योजना तसेच शासकीय कार्यक्रमात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांना सुनील केदार सोबत घेऊनच जाताण. याबाबत जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर म्हणतात की, संघटनेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची पालकमंत्र्यांची भूमिका राहिली आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित राहतात. पालकमंत्र्यांनी संघटनेसाठी चालवलेली धडपड अन्य पक्षांना आश्चर्यात टाकणारी ठरत आहे. तिकडे भाजपमध्ये झालेले बदलही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. डॉ. शिरीष गोडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षनेतृत्वाने निष्ठावंत सुनील गफाट यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपवले आहे. पक्षातील सर्व गटांना सांभाळून घेण्याचे गोडे यांनी दाखवलेले कौशल्य नव्या जिल्हाध्यक्षांनाही दाखवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
शिवसेनेतही आकस्मिक बदल झाले आहेत. संपर्कप्रमुख अनंत गुढे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाला त्याची दखल घ्यावीच लागली. गुढे यांची उचलबांगडी करण्यात आली. नवे संपर्कप्रमुख म्हणून ठाण्याचे माजी नगरसेवक बाळा राऊत यांची नियुक्ती झाली. गटबाजीला मोडून काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. सत्ताधारी पक्ष असूनही जिल्ह्याचे नेते न्याय मिळवून देत नसल्याच्या शिवसैनिकांच्या तक्रारी आहेत. एका युवा शिवसैनिकाने पत्र लिहून पक्षातील असंतोषाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचीच पदावरून गच्छंती झाली. साधे शिवभोजन केंद्र मिळत नसेल तर सत्ता काय कामाची, अशी प्रतिक्रिया शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे सत्तेत बोलबाला असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील कार्याचे स्वरूप आक्रसलेले दिसून येत आहे.
पक्षाचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्याकडे ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी आहे. युवानेते अभिजीत फाळके यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे विविध प्रश्न पक्षनेते शरद पवार यांच्याकडे मांडून कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. मात्र पालकमंत्री केदार यांच्या प्रभावामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या अन्य दोन सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना फारसा वाव दिसत नाही. काँग्रेसच्या विविध गटांना एकत्र आणतानाच विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही सांभाळून घेण्याचे कौशल्य पालकमंत्री केदार दाखवत आहेत.
संभाव्य राजकीय परिणाम
सुनील केदार हे आक्रमक व त्याचवेळी पक्षातील व इतर पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी ओळखले जातात. मंत्री म्हणून मतदारसंघात कामे करत वर्धा जिल्ह्यात पक्षबांधणीचे काम केदार यांनी हाती घेतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बरोबरच पुढील लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला मतदारांचा हात लाभू शकतो.