हर्षद कशाळकर
राजकारणाच्या आखाड्यात रायगड जिल्ह्यात तटकरे कुटुंबाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. मात्र खेळाच्या मैदानातही आम्ही कमी नाही याची प्रचीती तटकरे कुटुंबाने श्रीवर्धन येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने घडवून दिली. तालुका क्रीडा संकुलाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने खासदार सुनील तटकरे आणि कन्या अदिती तटकरे बॅडमिंटनच्या मैदानावर उतरले. या निमित्ताने वडिलांचे क्रीडानैपुण्य हे क्रीडा राज्यमंत्री असलेल्या अदिती तटकरे यांच्यापेक्षा सरस असल्याचे पाहायला मिळाले.
श्रीवर्धन येथील तालुका क्रीडा संकुलाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. दोन दशकांच्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीवर्धनकरांना हक्काचे सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध झाले. या लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्याच्या पालकमंत्री, मतदार संघाच्या आमदार आणि क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. खासदार सुनील तटकरेही या सोहळ्यासाठी श्रीवर्धनमध्ये दाखल झाले होते. या निमित्ताने बापलेक दोघेही एकमेकांसमोर बॅडमिंटनच्या मैदानात उतरले. या सामन्यात दोघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. अटीतटीच्या सामन्यात सुनील तटकरे यांनी बाजी मारली. राजकारणातच नाही तर खेळाच्या मैदानातही आपला कोणी हात धरू शकत नाही हे खासदार तटकरे यांनी दाखवले. वडिलांचे क्रीडा नैपुण्य पाहून क्रीडा राज्यमंत्री अदितीही चकित झाल्या.
धुळे मनपात सत्ताधारी भाजपवर स्वपक्षीयांकडूनच आगपाखड
तटकरे यांचे खेळांवर असलेले प्रेम त्यांनी कधीच लपवलेले नाही. शालेय जीवनातही त्यांनी खेळाच्या मैदानावर आपले कसब दाखवून दिले आहे. अलिबाग येथे जिल्हा क्रीडा संकुलाचे काम तीन दशक रखडले होते. रायगडचे पालकमंत्री झाल्यावर हे क्रीडा संकुल तटकरे यांनी पाठपुरावा करून पूर्ण करून घेतले होते. जिल्ह्यात राष्ट्रीय राज्यस्तरीय, कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, बॉडिबिल्डींग स्पर्धांचे आयोजन त्यांनी वेळोवेळी केले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ते सध्या कार्यरत आहे.