अलिबाग– लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात अटीतटीचा सामना पहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी ही लढत सहज जिंकली. मतदारसंघातील अकार्यक्षमता आणि धार्मिक ध्रुवीकरण करून, सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गीते यांचा प्रयत्न फसला. रायगडकरांनी प्रवाहाविरोधात जाण्याची परंपरा यंदाही कायम राखली.
रायगडचा मतदारसंघ हा प्रवाहाविरोधात जाणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली. राज्यातील बहुतांश भागात महाविकास आघाडीचा प्रभाव होता. पण रायगडमध्ये हा प्रभाव दिसला नाही. मतदारांनी पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर विश्वास दाखवला.
हेही वाचा – तिहार तुरुंगातून ओमर अब्दुल्लांचा पराभव करणारे राशिद शेख कोण आहेत?
अनंत गितेंना मतदारसंघातील अकार्यक्षमता नडली. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले अनंत गीते पाच वर्षे अज्ञातवासात होते. शिवसेनेतील बंडानंतर ते पुन्हा एकदा सक्रीय झाले. गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन करत त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. धर्म आणि जातीच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम झाला नाही. निवडणूक काळात पक्षाची यंत्रणा खूपच कुचकामी ठरली. शेकाप आणि काँग्रेसची अपेक्षित साथ गीतेंना मिळाली नाही. त्यामुळे सातव्यांदा लोकसभेवर निवडून जाण्याचा गितेंचा प्रयत्न फसला.
मतदारसंघातील सक्रीयता, दांडगा जनसंपर्क सुनील तटकरेंच्या पथ्यावर पडले. शिवसेना शिंदे गट, भाजप, मनसे, आरपीआय यांची साथ तटकरेंसाठी मोलाची ठरली. अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य तटकरेंसाठी निर्णायक ठरले. महाड विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी राखण्यात तटकरे यशस्वी ठरले. त्यामुळे दापोली आणि गुहागरमध्ये पिछेहाट होऊनही त्याचा निवडणूक निकालावर फारसा परिणाम झाला नाही. अलिबाग मुरुड आणि श्रीवर्धनमधील मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रभाव कमी करण्यात तटकरेंना यश आले. महायुतीतील घटक पक्षात समन्वय ठेवण्यात तटकरे बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरले. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग सोपा होत गेला.
हेही वाचा – मायावतींच्या बसपाला उतरती कळा; मतदारांनी का नाकारलं?
निवडणूक प्रचारात अनंत गीते यांनी चांगलीच आघाडी घेतली होती. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मतदारसंघात सभा घेऊन मतदारांना भावनिक साद घातली होती. निवडणूक प्रचारातही शरद पवार, रोहीत पवार, जितेंद्र आव्हाड, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी गीतेसाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या. त्यामुळे मोठ्या सभांच्या नियोजनात पक्षाची यंत्रणा गुरफटून राहिली. या उलट तटकरे यांनी मोठ्या सभांना फाटा देऊन कॉर्नर सभा आणि मतदारांच्या संपर्कावर भर दिला. त्यामुळे प्रचार यंत्रणा अधिक कार्यक्षमतेने काम करू शकली.