अलिबाग : शिवसेना आणि भाजप आमदारांच्या विरोधानंतरही मुलीसाठी रायगडचे पालकमंत्री पद मिळवण्यात सुनील तटकरे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पालकमंत्रीपदमलाच मिळणार असा दावा करणाऱ्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यमंत्री मडळात कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांना हाताशी धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्ह्यातील आमदारांनी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच हवेत असा सूर लावला होता. त्यामुळे पालकमंत्रीपदाबाबत गोगावले प्रचंड आशावादी होते. जाहीर कार्यक्रमांमधूनही त्यांनी माध्यमांशी बोलतांना पालकमंत्रीपद आपल्याच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

आणखी वाचा-सांगलीत पक्ष विस्ताराची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर

मात्र भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांचा विरोध असूनही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुलीसाठी मिळवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यशस्वी ठरले आहेत. जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या राजकारणावर आपली पकड त्यांनी यातून पुन्हा सिध्द करून दाखवली आहे. गोगावले यांच्याकडून जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दावा सांगितला जात असतांना तटकरे यांनी कुठलिही प्रतिक्रीया दिली नाही. आमदारांकडून आदितीच्या नावाला विरोध सुरू असतांनाही त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. पालकमंत्री पदासाठी जाहीर वाच्यता न करता त्यांनी पडद्यामागून सूत्र हलवत ठेवली. त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला. तटकरेंची मुत्सदेगिरी आणि राजकीय दादागिरी फळाला आली. मुलगी आदिती पुन्हा एकदा रायगडची पालकमंत्री झाली.

रायगड जिल्ह्याचे राजकीय बलाबल लक्षात घेतले तर जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून पालकमंत्री पदासाठी आग्रह धरणे स्वाभाविक होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तटकरेंची राजकीय खेळी शिवसेनेच्या वर्मी लागली आहे. हा निर्णय मनाला पटण्यासाराखा नाही अशी प्रतिक्रीया गोगावले यांनी दिली आहे. त्यांच्या समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा जिल्ह्यात तटकरे विरुध्द शिवसेना असा टोकाचा संघर्ष पहायला मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

आणखी वाचा-पंधरा वर्षानंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री; जिल्ह्यातील आमदारांना सांभाळून काम करण्याचे आव्हान

२०२२ मध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेनेतील बंडखोरीला आदिती तटकरे यांचें पालकमंत्रीपद कारणीभूत ठरले होते. त्यामुळे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सहभागी झाला होता. त्या नंतर आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना आमदारांनी मिळू दिले नव्हते. दोन वर्ष रत्नागिरीच्याच उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. आता मात्र शिवसेना आमदांरांचा विरोध डावलून आदिती तटकरेना पालकमंत्री पद दिले गेल्याने, महायुतीमधील असंतोष नव्याने उफाळून येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare succeeds in getting guardian minister post for daughter despite shiv senas opposition print politics news mrj