ठाणे: विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले होते. सुरुवातीच्या काळात सुरू असलेला हा संघर्ष शांत होत असतानाच आता मुंब्रा शाखेच्या पडकामावरून पुन्हा एकदा या वादाने तोंड वर काढले आहे. शंकर मंदिर परिसरात वर्षानुवर्ष उभी असलेली शाखा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कट्टर समर्थकांनी पाडल्याने उद्धव ठाकरे यांच्या हाती आयता मुद्दा लागला असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शनिवारी ठाकरे यांचे होणारे शाखा बचाव आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे.
शिवसेना घराघरात पोहचविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणी बजावली असेल तर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गाव पाड्यात सुरू केलेल्या शिवसेना शाखांनी. दीड वर्षांपूर्वी शिवसेना नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे स्वतंत्र राजकारण सुरू झाले. या राजकारणाचा आणि वादाचा महत्वाचा केंद्रबिंदू ठरल्या त्या प्रत्येक शहरात असणाऱ्या शिवसेनेच्या शाखा ठाणे जिल्ह्यात हा संघर्ष अधिक दिसून आला.
हेही वाचा… विदर्भात अजित पवार गटाची ‘नवी वेळ’ कधी?
शहराच्या विविध विभागात असणाऱ्या शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधील वाद अनेकदा विकोपाला गेल्याचे चित्र होते. परस्पर विरोधी घोषणा, अरेरावी, बॅनर फाडणे यावरून सुरू झालेले हे वाद हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हे इथ पर्यंत येऊन पोहचला होता. सुरुवातीचे काही महिने अगदी टोकाला पोहचलेला हा वाद मागील काही महिन्यांपासून थंडवल्याचे पाहायला मिळाले. असे असतानाचा आता मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात २२ वर्ष जुनी शिवसेना शाखा पाडण्यावरून पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला आहे. या प्रकरणात आता उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली असून ते स्वतः शनिवारी मुंब्रा या ठिकाणी भेट देणार आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शाखांचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आधी शाखांवरून वाद कुठे?
मागील जून – जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील सर्व राजकीय परिस्थितीत बदलली. तर याचे थेट परिणाम शिवसेनेच्या स्थानिक राजकारणावर देखील झाले. सुरुवातीच्या काळात डोंबिवली येथील मध्यवर्ती शाखा कोणाची यावरून वाद उफाळून आला. यावेळी शिंदे गटाने या ठिकाणी आपले वर्चस्व दाखवत जिल्ह्यातील मध्यवर्ती शाखा ताब्यात घेतली. तर यानंतर लगेच ठाणे शहरात वसंत विहार, शिवाई नगर, मनोरमा नगर, चंदन वाडी या शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांमध्ये द्वंद झाल्याचे पाहायला मिळाले. तर मुख्यमंत्री पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयावर ही दगडफेक झाली होती. यामुळे सुरुवातीच्या काळात ठाणे जिल्ह्यात काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. यामध्ये बहुतांश वेळा पोलिसांना मध्यस्थी करत वाद मिटवावे लागले आहेत. हे चित्र काहीसे शांत होत असल्याचे दिसत असतानाच आता मुंब्रा शाखेवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे.
मुंब्रा शाखेवरून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी
मुंब्रा येथे शंकर मंदिर परिसरात शिवसेनेची मध्यवर्ती शाखा आहे. मागील काही दिवसांमध्ये ही शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेनेचा उबाठा गट आणि शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर नुकतेच या शाखेचे पाडकाम करण्यात आले आहे. यावरून ऊबाठा गटाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लक्ष्य करत शाखांवर बुलडोझर फिरवणारे कसले शिवसैनिक हे तर कलंक आहेत असा आरोप केला होता. तर उद्धव ठाकरे या शाखेला स्वतः भेट देणार असल्याचे उबाठा गटाकडून अधिकृत रीत्या स्पष्ट करण्यात आले आहे. यालाच प्रतिउत्तर देत शिंदे गटाकडून ” दिघे साहेब तुम्हाला अजूनही खुपतात का ? ” असा थेट सवाल करण्यात आला आहे.
मुंब्रा शहर शाखेसह आसपासची जागा उबाठा गटाच्या शहरप्रमुखाने भाड्याने दिली होती. शाखेच्या बाहेरच सर्व्हिसिंग सेंटर, बाजूला गॅरेज, मागच्या बाजूला बांधकाम साहित्याचा व्यवसाय यांना जागा देऊन हा शहरप्रमुख शाखेच्या नावावर धंदा करून भाडे घेत होता. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी उभारलेल्या या शाखेची मागील काही दिवसात जीर्ण अवस्था झाली होती. मात्र त्याकडेही कुणीही लक्ष देत नसल्याने अखेर शिवसैनिकांनी ही शाखा ताब्यात घेतली आणि तिची खऱ्या अर्थाने सुटका केली. मुख्यमंत्री एकनाथज शिंदे यांनी शाखांना नवसंजीवनी देण्याच्या अभियानांतर्गत भूमिपूजन करून पुनर्विकासाचे काम हाती घेत या ठिकाणी एक सुसज्ज शाखा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र आधीपासून डोळ्यात खुपत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या शाखेचा पुनर्विकास होत असल्याने काही जणांना पोटदुखी सुरू झाली आणि शाखा पाडल्याचा कांगावा त्यांनी सुरू केला असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.