पुणे : पुण्याच्या पालकमंत्री पदात झालेल्या बदलानंतर पुण्याचा नक्की कारभारी कोण, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांंना या पदावरून पायउतार करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंच्या हाती कारभार दिल्यानंतर दोन्ही सत्ताधाऱ्यांंमध्ये धुसफूस सुरू झाली असताना, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ‘पुण्यात बरेच कारभारी बदलले आहेत. त्यामुळे मलाही पुण्यात काम करावे लागेल’ असे वक्तव्य केल्याने ‘पुण्याचा कारभारी’ हा शब्द पुन्हा चर्चेत आला आहे.

अजित पवार हे यापूर्वी पुण्याचे कारभारी होऊन २५ वर्षांचा कालावधी उलटला असून, त्यावेळी जन्माला आलेल्या राजकीय क्षेत्रातील ‘पुणे पॅटर्न’ची आगामी महापालिका निवडणुकांंनंतर पुनरावृत्ती होऊन पुण्याचा नवा कारभारी कोण असेल, याबाबत आतापासून चर्चेला उधाण आले आहे. पुणे महापालिकेची २००७ ची निवडणूक ही ऐतिहासिक ठरली होती. तेव्हा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुण्याचा कारभारी बदला, अशी हाक दिली होती. तेव्हा तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी हे पुण्याचे सर्वेसर्वा होते. पुणेकरांनी पवारांंच्या हाकेला प्रतिसाद देत राष्ट्र्रवादी काँग्रेसला साथ दिली होती. त्यामुळे अजित पवार हे पहिल्यांंदा पुण्याचे कारभारी झाले होते. मात्र, २००७ मधील पुणे महापालिकेच्या निवडणुकीत निकाल हा पूर्णपणे राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या बाजूने नव्हता. मात्र, काहीही झाले तरी कलमाडींंशी समझोता न करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने राजकीय क्षेत्रातील ‘पुणे पॅटर्न’ जन्माला आला होता. आता राज्यातच हा पॅटर्न अस्तित्त्वात असला, तरी पालकमंत्री पदाच्या बदलानंतर अजित पवार आणि चंद्रकांंत पाटील यांंच्यातील धुसफूस वाढली आहे. अजित पवार यांनी जिल्ह्यासह शहराच्या कारभाराकडे लक्ष दिले असताना, पाटील यांनी पुणे शहरातील विधानसभा मतदार संघनिहाय बैठकांंचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांनंतर पुण्याचा कारभारी होण्यासाठी दोघांंमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता खासदार सुळे यांनी ‘पुण्यात बरेच कारभारी बदलले आहेत. त्यामुळे मलाही पुण्यात काम करावे लागेल’ असे वक्तव्य केल्याने पुण्याचे कारभारी पद आता चर्चेत आले आहे. सुळे यांनीही पुण्याच्या स्थानिक प्रश्नांकडे लक्ष देत महापालिकेत आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘पुण्याच्या कारभारी’ पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा झाला आहे.

हेही वाचा – इंदौरमध्ये मराठी भाषक उमेदवारीपासून वंचित?

हेही वाचा – जायकवाडीच्या पाणी प्रश्नावर नगरचे राजकारण तापले

पुणेकरांनी २००९ च्या निवडणुकीत ‘पुणे पॅटर्न’ला तिलांजली देण्याची वेळ आणली. त्यावेळी अजित पवार यांना कलमाडी यांंची मनधरणी करण्याशिवाय मार्ग राहिला नव्हता. त्यामुळे पुण्याचे कारभारी पद पवार यांच्याकडून गेले होते. मागील निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्याने चंद्रकांत पाटील हे पुण्याचे कारभारी झाले होते. मात्र, पवार यांंच्याकडे २५ वर्षांनंतर कारभारी पद आल्यानंतर शहरातील राजकारणाला वेग आला आहे.

Story img Loader