महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचं लग्न लवकरच होणार आहे. बारामतीच्या खासदार आणि जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातले फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात का? ही चर्चा करायला वाव निर्माण झाला आहे. याचं कारण काय? जाणून घेऊ.

२०२३ मध्ये काय घडलं?

२०२३ मध्ये अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाले. राष्ट्रवादीतल्या ४३ आमदारांना बरोबर घेऊन जात त्यांनी महायुतीत उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. त्याचप्रमाणे लोकसभेला पवार विरुद्ध पवार असाही सामना बारामतीत घडला. कारण महायुतीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे होत्या. समोरासमोर हा नणंद भावजयीचा सामना होता. पण प्रत्यक्षात अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच हा सामना ठरला. लोकसभेच्या सामन्यात बाजी मारली ती शरद पवारांनी कारण सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून येत खासदार झाल्या. यानंतर अजित पवारांनी कंबर कसली. बारामतीतून उभं राहून पुन्हा एकदा जिंकून येण्याचा विक्रम विधानसभा निवडणुकीत करुन दाखवला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभेत चांगलं यश

अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला त्यात महायुतीला २३७ जागांचं प्रचंड बहुमत मिळालं. नोव्हेंबर महिन्यात निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्यात म्हणजेच १२ डिसेंबर या दिवशी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. आता अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्याचे फोटो सुप्रिया सुळेंनी पोस्ट केल्याने या चर्चा पुन्हा सुरु होऊ शकतात.

सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये काय?

सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे पवार कुटुंबासह असलेले फोटो पोस्ट केले आहेत. या दोघांचा साखरपुडा लवकरच पार पडणार आहे. अजित पवारांचा धाकटा मुलगा जय आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा झाला की काही दिवसांमध्ये लग्नही होणार आहे. या दोघांनीही शरद पवार यांची आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली. यासंदर्भातले फोटो सुप्रिया सुळेंनी पोस्ट केल्याने अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील का? या चर्चांना उधाण येऊ शकतं.

शरद पवार हे पवार कुटुंबाचे कुटुंबप्रमुख

शरद पवार यांची साथ अजित पवारांनी २०१९ मध्येही सोडली होती. पण नंतर ते शरद पवारांबरोबर आले. आता मात्र तशी परिस्थिती नाही. तरीही कौटुंबिक दुरावा या दोघांमध्ये जाहीरपणे दिसलेला नाही. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात मात्र तो दिसला आहे. कारण सुप्रिया सुळे भाऊबीजेच्या दिवशी अजित पवारांना भेटल्या नव्हत्या किंवा अजित पवारही सुप्रिया सुळेंच्या भेटीला आले नव्हते. शरद पवारांनी आपण कुटुंबप्रमुख आहोत असं अनेकदा म्हटलं आहे. त्या नात्यानेच जय पवार हे शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची भेट घेतली.

अजित पवारांबाबत दिवाळीच्या आधी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

“मी सगळ्यांच्या चांगल्या आठवणीच लक्षात ठेवते. बारामतीची मायबाप जनता शरद पवारांवर सहा दशकांपासून प्रेम करते आहे. आमचं नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं आहे. एक काळ असाही होता की पवार कुटुंबाला कुणी ओळखत नव्हतं पण बारामतीकरांनी जी आपुलकी आणि प्रेम दाखवलं त्यामुळे पवार कुटुंब ओळखलं जातं. अजित पवार वेगळे झाले त्याची वेदना आहेच. कारण मी नात्यांना खूप महत्त्व देते. नाती फक्त रक्ताची नाही तर प्रेम आणि विश्वासाची असतात. सत्ता आणि पैसा येतात आणि जातात पण नाती महत्त्वाची असतात तीच टिकतात. ” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.

येत्या काळात कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात?

दरम्यान याच सुप्रिया सुळेंनी आता जय पवार यांचे आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे पवार कुटुंबासह एकत्र फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय घडणार? दोन पवार एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसची शकलं जोडली जाणार का? घरातलं कार्य राजकारणातला कार्यभाग साधणार का? शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र आलं पाहिजे अशी इच्छा युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार आणि अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनीही म्हटलं होतं. अजित पवारांच्या मुलाचं लग्न होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कदाचित या सगळ्यांची उत्तरं मिळू शकतात.

Story img Loader