Karnataka Sex Scandal जनता दल (धर्मनिरपेक्ष) गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. कर्नाटक सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावालाही आता पोलिसांनी अटक केली आहे. प्रज्ज्वल रेवण्णाचा मोठा भाऊ आमदार सूरज रेवण्णा याच्यावर पक्षातीलच एका पुरुष कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रविवारी (२३ जून) हसन पोलिसांनी सूरजला अटक केली आहे.

सूरजवर कलम ३७७ (अनैसर्गिक शारीरिक संबंध) आणि ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे) यासह विविध आयपीसी कलमांखाली शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली. शिवकुमार नावाच्या सूरजच्या एका सहाय्यकाने एक दिवसापूर्वी एक प्रति-तक्रार दाखल केली होती, ज्यात तक्रारदाराने आमदारावर चुकीचे आरोप केल्याचे नमूद करण्यात आले होते.

हेही वाचा : भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरून अयोध्येच्या महंतांचा जिल्हाधिकार्‍यांशी वाद; कोण आहेत महंत राजू दास?

कोण आहे सूरज रेवण्णा?

सूरज हा जेडी(एस) आमदार एच. डी. रेवण्णा यांचा मुलगा आहे. एच. डी. रेवण्णा हे केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे मोठे बंधू आहेत. सूरज व्यवसायाने एक डॉक्टर आहे. कर्नाटकात पदावर निवडले गेलेले ते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील सातवे सदस्य आहेत. सूरजने २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. सूरजच्या अटकेमुळे एच. डी. रेवण्णा यांची दोन्ही मुले आता तुरुंगात आहेत, तर रेवण्णा स्वत: आणि त्यांची पत्नी भवानी रेवण्णा कथित अपहरणाच्या खटल्यात जामिनावर बाहेर आहेत.

सूरज रेवण्णा आणि प्रज्ज्वल रेवण्णा (छायाचित्र- इंडियन एक्सप्रेस)

सूरजने क्वचितच सभागृहातील वादविवादांमध्ये भाग घेतला आहे, ज्यामुळे त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध आईने निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. भवानी रेवण्णा यांना राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी ओळखले जाते. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत हसन विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी स्वत: आणि सूरज दोघांसाठी जोरदार प्रयत्न केले होते. पण, कुमारस्वामी यांनी दोन्ही प्रस्ताव फेटाळले.

प्रज्ज्वल रेवण्णाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात खोटे उत्पन्न जाहीर केल्याचा खुलासा २०२३ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने केला. त्यानंतरच रेवण्णा कुटुंब अडचणीत आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू असताना प्रज्ज्वल रेवण्णाचे महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे अनेक व्हिडीओ लीक झाले. हसनमधील मतदानाच्या एका आठवड्यानंतर आणि कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या काही दिवस आधी, २७ एप्रिल रोजी प्रज्ज्वल जर्मनीला रवाना झाला. ३१ मे रोजी भारतात परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. प्रज्ज्वलच्या विरोधात दाखल केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली.

प्रज्ज्वल जर्मनीत लपलेला असताना, त्याच्या वडिलांनाही कथित अपहरणाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. एच. डी. रेवण्णा यांनी कथित पीडितांपैकी एकाचे अपहरण केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला होता. एच. डी. रेवण्णा यांना ४ मे रोजी अटक करण्यात आली होती आणि १४ मे रोजी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. अपहरण प्रकरणातील आरोपी असलेल्या एच. डी. रेवण्णा यांच्या पत्नी भवानी यांनाही गेल्या आठवड्यात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता.

हेही वाचा : राहुल गांधींची नवीन ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम काय आहे? या मोहिमेचा उद्देश काय?

शनिवारी सूरजचा वाद चिघळल्याने कुमारस्वामी यांनी या प्रकरणापासून स्वतःला दूर केले. “कृपया माझ्याशी अशा विषयांवर चर्चा करू नका”, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. प्रज्ज्वल प्रकरणाने राज्य हादरले तेव्हा कुमारस्वामी यांनी त्यांना पक्षातून निलंबित केले होते आणि निवडणुकीदरम्यान व्हिडीओ लीक केल्याचा आरोप करत काँग्रेसचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही लक्ष्य केले होते.