प्रदीप नणंदकर
राज्यात सत्तांतर होऊन भाजप सत्तेत आल्याने महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम केलेल्या अमित देशमुख यांची आगामी लातूर महापालिका निवडणुकीत दमछाक होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. लातूर महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवकच महापौरांना अडचणीत आणत होते. दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने भाजपच्या आक्रमक प्रचारासमोर टिकाव धरणे अवघड असल्याने काँग्रेसची घसरण थांबविणे आता अमित देशमुखांसमोर आव्हान असणार आहे.रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातूर शहरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी उजनीचे पाणी देऊ अशी घोषणा अमित देशमुख यांनीही केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. गावातील बाजार समिती एमआयडीसी भागात स्थलांतर करण्याचे आश्वासन तसे जुनेच. पण तेही काम झाले नाही अशा अनेक मुद्दयांची जंत्री भाजपच्या भात्यात आहेत.
एकेकाळी संपूर्ण राज्यभर लातूरच्या काँग्रेसमधील नेत्यांचे नाव देशभर घेतले जाई. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख या नेत्यांचा मोठा दबदबा होता. त्यामुळेच लातूरचे नाव राजकारणात राज्यभर घेतले जात होते. विलासराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर यांच्या निधनानंतर लातूर जिल्ह्यात काँग्रेसची घसरण सुरू झाली. आता काँग्रेस लातूर शहर व ग्रामीण या दोन मतदारसंघापुरतीच राहिली आहे. जिल्ह्यात साखर कारखानदारीच्या माध्यमातून व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून काँग्रेसची पकड असली तरी गेल्या काही वर्षात नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती, बाजार समिती या निवडणुकांमधून काँग्रेसचे अस्तित्व कमी होत चालले आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा निलंगा हा बालेकिल्ला, मात्र या निलंगा नगर परिषदेत काँग्रेसचे नगरसेवक फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. तीच अवस्था अहमदपूर, उदगीर ,रेणापूर अशा नगर परिषदेमध्ये आहे.निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी नगरपंचायतीत काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले, मात्र तेव्हा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. काँग्रेसच्या ताब्यातून जिल्हा परिषद गेलेली आहे. लातूर महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर राहिला मात्र स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडेच राहिले. खासदारकी गेल्या दोन वेळेपासून काँग्रेसकडे नाही.
भाजपने लोकसभेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अनेक तालुक्यात काँग्रेसला अतिशय कमी मतदान होते. आगामी काळात लोकसभेला उमेदवार कोण ? यासाठी काँग्रेस पक्षाला मेहनत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष राहिलेले ॲड. व्यंकट बेद्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लातूर वगळता जिल्ह्यात दखल घ्यावी असा काँग्रेसकडे नेताच शिल्लक राहिलेला नाही.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर पुन्हा नव्याने राजकीय गणिते घालावी लागणार आहेत. आता नव्या सरकारमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवली तरी त्याला यश मिळणे दुरापास्त आहे कारण भाजपच्या ताब्यात जिल्हा परिषद आहे. लातूर व्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य संस्था ताब्यात राहाव्यात ही इच्छाशक्तीच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये शिल्लक आहे की नाही असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना मानणारा वर्ग जिल्हाभर आहे. मात्र आशावाद निर्माण करण्याला त्यांनाही मर्यादा असल्याचे दिसून येते.
निलंगा व औसा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. विधान परिषदेत आमदार रमेश कराड हे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे रेणापूर तालुक्यावर त्यांचे चांगलेच प्राबल्य आहे. अहमदपूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असला तरी आता नव्याने राजकीय गणित बदलल्याने या मतदारसंघात भाजप डोके वर काढेल. या मतदारसंघात काँग्रेसला फार पूरक स्थिती नाही. उदगीर विधानसभा मतदारसंघातील उदगीर व जळकोट या दोन तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री संजय बनसोडे यांनी आपली छाप पाडली आहे .जळकोट नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आहे ,उदगीर बाजार समितीतही राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे मात्र उदगीर नगर परिषदेवर भाजपचे प्राबल्य आहे. आता नव्याने भाजप सत्तेत आल्याने चित्र बदलू शकते.चाकूर नगरपंचायतीत भाजप व प्रहार एकत्र येऊन सत्तेत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्वच कोठे नाही. अशा स्थितीमध्ये अमित देशमुख यांच्यासमोर काँग्रेसची घसरण थांबविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.