काही दिवासांपूर्वी बिहारच्या सारणमध्ये दारू पिल्याने ४० जणांना मृत्यू झाला होता. याप्रकरणावर बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दारु पिल्याने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कोणीतीही आर्थिक मदत दिली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. ‘दारू पियोगे तो मरोगे’, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, या विधानावरून विरोधकांकडून नितीशकुमार यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
हेही वाचा – माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांच्या पुतळा अनावरणास राज्यपालांचा नकार ?; विधानसभेत काँग्रेसचा आरोप
आज भाजपाचे राज्यसभा खासदार आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी सारणमध्ये जात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुशील मोदी यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ज्याप्रकारे असंवेदनशील विधान केलं आहे, त्याचं आर्श्चय वाटतं आहे. ते अशा प्रकारे कसं बोलू शकतात? त्यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्याची सुत्रे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे द्यावी, ते राज्याचा कारभार योग्यप्रकार सांभाळू शकतात”, असे ते म्हणाले.
सारणमध्ये झालेल्या घटनेत ४० जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यावरून सुशीलकुमार मोदी यांनी बिहार सरकारवर टीका केली, “सारणमध्ये १०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारने ही आकडेवारी दाबण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मृतदेहांचे शवविच्छेदनदेखील झाले नाहीत. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची नेमकी संख्या किती हे सांगता येत नाही. ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी अनेक जण हे मागासवर्गीय असल्याचे पुढे आले आहे”, असे ते म्हणाले. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, सुशीलकुमार मोदींच्या आरोपानंतर जेडीयूचे प्रवत्ते के.सी. त्यागी यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. “सुशील मोदी ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून त्यांचा दुटप्पीपणी दिसून येतो आहे. हेच सुशील मोदी लालू प्रसाद यादव आणि तेवस्वी यादव सत्तेत असताना त्यांच्यावर ‘जंगलराज’चा आरोप करत होते. मात्र, आता ते नितीशकुमार यांचा राजीनामा मागून तेजस्वी यादव यांच्याकडे राज्याची सुत्रे देण्याचे म्हणत आहेत”, असे ते म्हणाले. तसेच नितीशकुमार यांच्या मद्यधोरणाकडे गांधीवादी दृष्टीकोणातून बघितले पाहिजे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.