एजाजहुसेन मुजावर
सोलापूर : केवळ सोलापूर वा महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात बलाढ्य नेता म्हणून गणले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची अलिकडे आठ-दहा वर्षांत मोदी लाटेत मोठी पिछेहाट झाल्यानंतर ते जवळपास राजकीय निवृत्तीचे दिवस काढत आहेत. मात्र वयाच्या ८० व्या वर्षात राजकारणात ते पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन १०-१५ किलोमीटर अंतर पायी चालताना शिंदे यांनी स्वतःच्या शारीरिक क्षमतेबरोबरच राजकीय प्रबळता दाखविल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेलाही पूर्ण विराम मिळाला आहे.
स्वतःच्या हक्काच्या सोलापूर लोकसत्ता राखीव मतदारसंघात २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन्हीवेळा मोदी लाटेत भाजपच्या अक्षरशः नवख्या उमेदवारांकडून सुशीलकुमार शिंदे यांना दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे नैराश्य असतानाच दुसरीकडे वृध्दापकाळामुळे आपण शारीरिकदृष्ट्या थकल्याचे सांगत सुशीलकुमारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. पक्षश्रेष्ठींनी त्यांना जबाबदाऱ्यांतून मुक्त केले आहे. त्यांचा राजकारणातील वावरही खूपच कमी झाला आहे. तसे पाहता २०१४ सालची सोलापूर लोकसभा निवडणूक ही आपल्या आयुष्यातील शेवटची असल्याचे सुशीलकुमारांनी जाहीर केले होते. ती निवडणूक गोड व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती.
हेही वाचा: राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत अनवाणी… भारत जोडो यात्रेकरू दिनेश शर्मांची पायपीट…
दारूण पराभवामुळे सुशीलकुमारांचा राजकीय निवृत्तीचा प्रवास सुरू झाला खरा; परंतु स्थानिक पातळीवर काँग्रेससमोर दुसरा पर्याय नसल्यामुळे २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सुशीलकुमारांनाच उभे राहणे भाग पडले. यात त्यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. याच पार्श्वभूमीवर सलग तीनवेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचाही राजकीय संघर्ष सुरू आहे. मागील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात डावलले गेल्यानंतर प्रणिती शिंदे नाराज होत्या. त्याचा राग काँग्रेसचे महाराष्ट्राचे तत्कालीन प्रभारी आणि विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर काढून त्यांचा पुतळाही जाळण्यात आला होता. त्याची राजकीय किंमत चुकवताना सुशीलकुमारांचा पाय आणखी खोलात गेल्याचे मानले जात होते. यातच बदलत्या राजकीय परिस्थितीत राज्यातील अन्य काही काँग्रेस नेत्यांसह आमदार प्रणिती शिंदे यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरत होती.
हेही वाचा: विक्रांत गोजमगुंडे : ध्येयनिष्ठ, कार्यप्रवण
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली असता सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतःच्या शारीरिक थकव्याचा सूर बाजूला ठेवून राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. १०-१५ किलोमीटर अंतर पायी चालताना सुशीलकुमारांची वयाच्या ८० व्या वर्षात शारीरिक क्षमता मजबूत दिसून येते. एवढेच नव्हे तर ते पुन्हा राजकीय सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळते. आमदार प्रणिती शिंदे यांनीही आपल्या भाजप प्रवेशाविषयी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर प्रथमच भाष्य करून आपली काँग्रेस पक्षावरील निष्ठा कायम असल्याचा निर्वाळा दिला आहे.