राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदारांना प्रामुख्याने लक्ष्य केले आहे. जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील पाच आमदार असल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांचे दौरे वाढू लागले असून त्यांच्या विरोधात होणाऱ्या घडामोडींनी शिंदे गटाच्या आमदारांमधील अस्वस्थताच उघड होत आहे. याआधी आदित्य ठाकरे आणि त्यानंतर सुषमा अंधारे यांच्या दौऱ्यातून हेच दिसून येत आहे. प्रामुख्याने अंधारे यांच्याकडून होणाऱ्या आक्रमक टीकेला रोखण्यासाठी त्यांच्या मुक्ताईनगरातील सभेवरच बंदी घातली गेल्याने अंधारे या आपल्या पुढील सभांमध्ये `ये डर मुझे अच्छा लगा` हा मुद्दा वारंवार मांडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- अजित पवारांनी बारामतीसाठी मंजूर केलेल्या २४५ कोटींच्या विकासकामांना चंद्राकांत पाटील यांची कात्री
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात महाप्रबोधन यात्रा काढली जात आहे. जिल्ह्यात या यात्रेचा मुक्काम तीन दिवस राहिला. अंधारे यांच्यासोबत युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते होते. अंधारेंची ही यात्रा विविध कारणांनी गाजली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात अंधारे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक फाडण्यात आल्याने अंधारे यांच्या हाती गुलाबरावांवर तुटून पडण्यासाठी आयतेच कोलित मिळाले. विशेष म्हणजे, याच मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचेही फलक फाडण्यात आले होते. अंधारे यांनी गुलाबरावांसह किशोर पाटील, चिमणराव पाटील, लता सोनवणे यांच्या मतदारसंघात सभा घेतल्या. धरणगाव, पाचोरा, पारोळा, चोपडा येथे त्यांच्या सभा झाल्या.
धरणगावातील सभेत युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी पालकमंत्री पाटील आणि त्यांच्या समाजाविरुध्द केलेले वक्तव्य न पटल्याने गुजर समाजासह विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकार्यांसह पोलीस अधीक्षकांकडे कोळी यांच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीची जिल्हाधिकार्यांनी अवघ्या तीन-चार तासांत दखल घेत तीन आदेश काढले. त्यात जाहीर सभा घेण्यास बंदी, कोळींना भाषणबंदी करण्यात आली. कोळींविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात अंधारेंची नियोजित सभा जिल्हाधिकार्यांच्या बंदी आदेशामुळे झाली नाही. मुक्ताईनगर येथे सभा घेण्याची तयारी करणार्या शिवसैनिकांवर पोलिसांनी कारवाई केली. जळगावमधील अंधारे, सावंत आणि इतर पदाधिकारी थांबलेल्या हॉटेलला पोलिसांनी गराडा घातला होता. मुक्ताईनगर येथे नियोजित सभेसाठी निघणार्या अंधारेंसह पदाधिकार्यांना पोलिसांनी रोखल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण झाले होते. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास अंधारेंनी थेट समाज माध्यमांचा वापर करून मुक्ताईनगरसह तालुक्यातील ग्रामीण भागात पदाधिकार्यांनी पाठविलेल्या लिंकद्वारे विचार मांडले. नंतर त्या बीड जिल्ह्यातील परळीकडे रवाना झाल्या.
हेही वाचा- संभाजी भिडे यांच्या भेटीमागे एकनाथ शिंदे यांचं दीर्घकालीन राजकीय गणित
बीडकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी आपण आपले काम फत्ते केल्याचे सांगितले. गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगरची सभा होणार नाही याची काळजी घेतली असली, तरी समाज माध्यमातून मुक्ताईनगरच्या हजारो युवकांनी घराघरांमध्ये बसून आपले विचार ऐकल्याचा दावाही त्यांनी केला. गुलाबरावांनी अंधारे यांचा तीन महिन्यांचे बाळ असा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ देत या सर्व प्रचारामुळे गुलाबराव पाटील तीन महिन्यांच्या बाळाला एवढे घाबरतील असे वाटले नव्हते, अशी टीकाही अंधारे यांनी केली. गुलाबरावांवर जातीच्या आड लपण्याची वेळ आल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे, गुलाबरावांनी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार कमी तर दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार अधिक झाल्याचा आरोप केला. जाहीर सभांना पोलीस, जिल्हाधिकार्यांनी परवानगी नाकारल्याने शासनाच्या दबावाखाली या सभेची परवानगी नाकारण्यात आल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. एकूणच, अंधारे यांनी विरोधकांना धडकी भरवली असली तरी या महाप्रबोधन यात्रेतून जनतेचे किती प्रबोधन झाले, हे सांगणे कठीणच आहे.