चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : काँग्रेसमधून निलंबित माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याने ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चेला ऊत आला आहे. देशमुख आणि बावनकुळे या दोघांनीही ही गैरराजकीय भेट होती, त्याचे राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले असले असले तरी या निमित्ताने देशमुख यांच्या भावी राजकीय वाटचालीबद्दल तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत.

भाजप ते काँग्रेस असा  राजकीय प्रवास असलेल्या देशमुखांवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यावर त्यांचा पुढचा पक्ष कोणता याबाबत उत्सूकता होती. या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यावर ते राष्ट्रवादीत जातील व या पक्षाकडून हिंगणा मतदारसंघातून निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरू झाली. मात्र सोमवारी अचानक त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुन्हा एकदा धक्का दिला.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती पण स्थानिक पातळीवर नेतृत्वाची पोकळी

मुळात डॉ. देशमुख यांचा राजकीय प्रवास धरसोडीचा राहिला आहे. २०१४ ची निवडणूक भाजपकडून काटोल मतदारसंघातून लढवून आमदार झालेले देशमुख या पक्षात फारकाळ रमले नाही.  पुढे २०१८ मध्येत्त्यांनी आमदारकी व भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवे्श केला. काँग्रेसने  त्यांना २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रिंगणात उतरवले होते.  या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी त्यांनी फडणवीसांच्या विरोधात घेतलेली मते लक्षवेधी होती.  त्यामुळे  त्यांचा पुढचा प्रवास काँग्रेसमध्येच सुरू राहील असे वाटत असतानाच त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर टीका-टिप्पणी करणे सुरू केले.

हेही वाचा >>> ठाकरेंच्या सभेने जळगावमध्ये शिवसैनिकांना बळ

थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच टीका केल्याने पक्षाने त्यांना  कारणे दाखवा नोटीस बजावून त्याचे  उत्तर सादर होण्यापूर्वीच निलंबित केले होते. त्यामुळे ते आता इतर पक्षात जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नेमकी त्याच वेळी त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली. ही भेट गैरराजकीय असल्याचा दोन्ही नेत्यांचा दावा असला तरी दोघांनीही यासंदर्भात सांगितलेली कारणे भिन्न आहेत. देशमुख यांनी त्यांच्या काटोल परिसरातील विकास कामांच्या संदर्भात भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे बावनकुळे म्हणाले तर बावनकुळे यांनी चहापाण्यासाठी बोलावले होते, असे देशमुख म्हणाले. पालकमंत्री म्हणून बावनकुळे यांचे काम चांगले होते. त्यांना अनुभव  असल्याने त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, असेही  देशमुख यांनी स्पष्ट केले. पण आत्ताच त्यांना बावनकुळेंच्या आशीर्वादाची गरज का भासली? ही भेट पूर्वनियोजित होती का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

हेही वाचा >>> कर्नाटकातील भाजपच्या उत्साही नेत्यांना अमित शहा यांनी लावला चाप

देशमुख यांनी माध्यमांना सांगितल्यानुसार त्यांनी पक्षाला दिलेल्या स्पष्टीकरणानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाईल. ते काँग्रेसमध्येच राहतील. पण विद्यमान स्थितीत काँग्रेसमध्ये त्यांच्यासाठी वातावरण अनुकूल नाही. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना माजी मंत्री सुनील केदार यांचा विरोध आहे तर राज्याच्या राजकारणातही त्यांना प्रतिकूल स्थिती आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात केलेल्या विधानामुळे ते देशमुख यांच्यावरील निलंबन मागे घेण्यास राजी होतील याची शक्यता कमीच आहे.  देशमुख-बावनकुळे भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास पटोले यांनी दिलेला नकार हीच बाब स्पष्ट करते. त्यामुळे देशमुख यांचा पुढचा राजकीय प्रवास काँग्रेससोबत राहण्याची शक्यताच तशी कमी आहे.  दुसरीकडे ते भाजपमध्ये गेल्यास त्यांना सावनेर किंवा त्यांच्या काटोल मतदारसंघातून  पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, पण त्यासाठी दोन्ही मतदारसंघातील स्थानिक नेत्यांकडून त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. शिवाय भाजपमधून बाहेर पडताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे ही बाबही दुर्लक्षित करणारी नाही.एकूणच देशमुख यांच्यासाठी भाजप  आणि काँग्रेसमध्ये अनुकूल परिस्थिती नाही. पण राजकारणात काहीही होऊ शकते हे मान्य केल्यास बावनकुळे- देशमुख भेट महत्वाची ठरते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspended former mla congress ashish deshmukh meet chandrasekhar bawankule bjp entry print politics news ysh
Show comments