पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांच्या मतदारसंघातून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळवण्यात यश आलेलं नसलं तरी त्यांना विधानसभेतील त्यांची संख्या वाढविण्यात निश्चितच यश आलं. तर, दुसरीकडे पूर्वा मेदिनीपूर इथे भाजपाला सुरुंग लावण्यात तृणमूल काँग्रेस यशस्वी झाले आहे. सोमवारी भाजपाच्या हल्दिया येथील आमदार तापसी मंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी दुसऱ्यांदा पक्ष बदलला आहे.

गेल्या चार वर्षांत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश करणाऱ्या विरोधी पक्षाच्या त्या नवव्या आमदार आहेत. त्यामुळे २९४ सदस्य असलेल्या विधानसभेत आता भाजपा सदस्यांची संख्या ६५ वर आली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेल्या काही प्रमुख नेत्यांमध्ये कृष्णनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मुकुल राय, उत्तर रायगंजमधून निवडून आलेले कृष्णा कल्याणी, बागदाहमधून निवडून आलेले विश्वजित दास यांचा समावेश आहे.

अधिकारी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक आणि आर्थिक केंद्र असलेला हल्दिया हा मतदारसंघ सुवेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातील आमदार पक्ष सोडून जाणं हा भाजपासाठी नक्कीच मोठा धक्का आहे. त्यामुळे पूर्वा मेदिनीपूरमध्ये भाजपाची पकड सैल करण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या प्रयत्नांना यश आले आहे.
पूर्वा मेदिनीपूरमध्ये विधानसभेच्या १६ जागा आहेत. त्यापैकी सात जागा भाजपाकडे, तर नऊ जागा तृणमूल काँग्रेसकडे आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघ जिंकले आणि १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली. मंडल यांच्या पक्षप्रवेशामुळे तृणमूलला आता आणखी बळ मिळणार आहे.

२०२१ व २०२४ या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं चांगली कामगिरी केली आहे. या दरम्यान मंडल या अधिकारी यांच्या संपर्कात होत्या आणि तेव्हाच त्यांनी भाजपात प्रवेशही केला होता.

“मंडल यांच्या टीएमसी प्रवेशामुळे आम्हाला संघटनात्मक मदत होईल आणि अधिकारी यांना मजबूत टक्कर देता येईल”, असे तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

भाजपा आणि अधिकारी यांनी, मंडल यांच्या जाण्याचा काही परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे. “याआधी मुकुटमनी अधिकारी, कृष्णा कल्याणी व विश्वजित दास यांनीही टीएमसीत प्रवेश केला आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला. मंडल यांचा तृणमूल काँग्रेसमधील प्रवेश मतदार स्वीकारणार नाहीत. मंडल यांच्याकडे कसलीही संघटनात्मक ताकद नाही. अगदी बूथ अध्यक्षही त्यांच्यासोबत जाणार नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही”, अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे.

मंडल यांचा राजकीय प्रवास
मंडल यांनी त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)मधून केली. २०११ मध्ये हल्दिया नगरपालिकेत त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षाने हल्दिया येथून त्यांना उमेदवारी दिली. सीपीआय (एम)च्या ३० उमेदवारांपैकी त्या एकट्या विजयी उमेदवार होत्या. पूर्वा मेदिनीपूर येथून त्या एकमेव सीपीआय (एम) आमदार होत्या. २०२० मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. टीएमसी आणि त्या पक्षाचे राजकारण याविरोधात लढण्यासाठीच त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे त्या प्रसंगी सांगितले होते. ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर अधिकारी यांनीही त्याच सुमारास भाजपामध्ये प्रवेश केला होता.

२०२१ च्या निवडणुकीत मंडल यांनी टीएमसीच्या स्वपन नास्कर यांचा १५ हजार मतांनी पराभव केला होता. याचं कारण हल्दियामध्ये मंडल यांचा मजबूत संघटनात्मक पाया आहे, तसेच त्यांच्याकडे निश्चयाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समर्पित संघ आहे.

सोमवारी पक्षप्रवेशाबाबत बोलताना मंडल यांनी सांगितलं, “त्यांना भाजपा नेतृत्वाचा पाठिंबा मिळाला नाही”. गेल्या वर्षभरात बंगाल भाजपामध्ये गटबाजी होत असल्याचे चित्र होते. त्यामुळेच मंडल यांनी हा निर्णय घेतल्याचे कळते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंडल यांनी तमलुकमधून अभिजीत गंगोपाध्याय यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. गंगोपाध्याय हे कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. गंगोपाध्याय विजयी झाल्यापासून मंडल आणि त्यांच्यात अनेक स्थानिक मुद्द्यांवरून तणाव निर्माण झाला होता.
तर या सर्व घडामोडींनंतर “त्या एक भ्रष्ट नेता होत्या, ज्या त्यांच्या जागी गेल्या”, अशी खोचक टीका गंगोपाध्याय यांनी मंडल यांच्यावर केली.

Story img Loader