Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधले विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंगळवारी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आम्ही मुस्लिम आमदारांना विधानसभेतून हाकलून देऊ असं अधिकारी यांनी म्हटलं आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले सुवेंदु अधिकारी?
“२०२६ मध्ये बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर भाजपाची सत्ता आली तर भाजपा मुस्लिम आमदारांना विधानसभेतून हाकलून देईल.” सुवेंदु अधिकारी यांच्या याच वक्तव्यावरुन राजकारण तापलं आहे.
तृणमूल काँग्रेसची टीका
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाने सुवेंदु अधिकारी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. सुवेंदु अधिकारी यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत घृणास्पद आहे असं तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे. सोमवारी भाजपाच्या हल्दिया येथील आमदार तापसी मंडल यांनी भाजपाला रामराम करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तापसी मंडल यांनी पाच वर्षात दुसऱ्यांदा पक्ष बदलला आहे. त्यावरुन त्यांनी तापसी मंडल यांच्यावरही टीका केली.
सुवेंदु अधिकारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास भाजपाचा नकार
सुवेंदु अधिकारी यांनी मुस्लिमांना हाकलून देऊ या संदर्भातलं जे वक्तव्य केलं त्याबाबत राज्यातील भाजपाच्या बड्या नेत्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले सुवेंदु अधिकारी यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं चुकीचं आहे. भडकाऊ भाषा वापरुन काय होणार आहे? धर्माच्या नावाखाली अशा पद्धतीची विधानं करणं चुकीचं आहे. सुवेंदु अधिकारी यांनी ज्या पद्धतीने हे वक्तव्य केलं आहे ते संविधानाच्या विरोधात आहे असंही कुणाल घोष यांनी म्हटलं आहे.
सुवेंदु अधिकारी यांच्यामुळे आधीही भाजपा अडचणीत
सुवेंदु अधिकारी यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी याआधीही भाजपाला अडचणीत आणलं आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सुवेंदु अधिकारी म्हणाले होते की सबका साथ आणि सबका विकास हा नारा संपवला पाहिजे आणि जे आमच्याबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर असा तो केला पाहिजे. जो हमारे साथ, हम उनके साथ असा नारा दिला पाहिजे असं ते म्हणाले होते. तसंच आम्हाला अल्पसंख्याक वर्गाची गरज नाही असंही ते म्हणाले होते. त्यानंतर पक्षाच्या सहकाऱ्यांनी हे विधान खोडून काढलं होतं. सुवेंदु अधिकारी यांना १७ फेब्रुवारीला विधानसभेतून निलंबित करण्यात आलं होतं आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन कायम असणार आहे. ममता बॅनर्जी सरकार सांप्रदायिक सरकार चालवत आहेत असा आरोप केला होता. तसंच हे सरकार म्हणजे मुस्लीम लीगचं दुसरं रुप आहे असंही म्हटलं होतं. मात्र भाजपाने या वक्तव्यावरही काही वक्तव्य केलं नव्हतं.