कोल्हापूर : दहा वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या राजकारणाची ओहोटी सुरू झाली. सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव, जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी संघटनेला ठोकलेला रामराम यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर यावेळी राजू शेट्टी हे तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राजकारणाची नवी खेळी सुरू करीत आहेत. जुना सहकारी उल्हास पाटील आणि डॉ. सुजित मिणचेकर या उद्धव ठाकरे शिवसेनेतील दोन माजी आमदारांना संघटनेत आणण्याचे कौशल्य त्यांनी दाखवले खरे. पण उमेदवारी कापलेले जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी शेट्टी यांच्यावर टीकास्त्र डागल्याने ते अडचणीत सापडले आहेत.
शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या चळवळीचे काम सुरू केलेल्या राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उभारणी केली. त्यातून ते जिल्हा परिषद , आमदार, दोन वेळा खासदार असा राजकीय प्रवास उंचावत जात असताना संघटनेत मतभेद वाढत गेले. उल्हास पाटील यांनी संघटनेला रामराम ठोकला. ते २०१४ साली शिवसेनेकडून निवडून आले. सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांचे वाभाडे काढत स्वाभिमानीचा त्याग करून भाजपकडून आमदारकी आणि कृषी राज्यमंत्रीपद मिळवले. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी हातकणंगलेतील खंदे कार्यकर्ते शिवाजी माने यांनी फारकत घेवून जय शिवराय संघटनेची चूल बांधली. पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजातील सहकारी असे बाजूला जात असताना विदर्भ -मराठवाड्यातही याहून वेगळी अवस्था नव्हती. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात स्वबळावर निवडणूक लढवली होती. मोर्शीचे देवेंद्र भुयार हे गेल्या विधानसभेला स्वाभिमानी कडून निवडून आले. नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी संधान साधले. स्वाभिमानीला असे अनेक धक्के पचवावे लागले.
हेही वाचा >>> मनोज जरांगे यांचा निर्णय लांबणीवर; उत्सुकता ताणली, कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढला
बेरजेचे राजकारण
दुसरीकडे, शेट्टी हे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेट्टी यांच्या राजकारणाची उतरंड सुरू झाल्याचे चित्र निर्माण आहे. आता शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राजकारणाची नवी खेळी ( इनिंग) सुरू केली असतानाच त्यांनी उल्हास पाटील आणि दोन वेळा निवडून आलेले डॉ. सुजित मिणचेकर यांना सोबत घेऊन बेरजेच्या राजकारणाचा नव्या अध्याय सुरू केला. शिरोळ तालुक्यात शेट्टी यांना मानणारा जैन समाज आणि उल्हास पाटील यांची मराठा मते तसेच हातकणंगले शेट्टी यांची जैन मते आणि मिणचेकर यांच्यासोबत असलेला बौद्ध समाज यांची बेरीज घालून विजयाचे आडाखे बांधले जात आहेत.
हेही वाचा >>> राज्यात ४७ मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना
शेट्टींचे वस्त्रहरण
दिवाळीच्या सुरुवातीलाच शेट्टी यांनी असा आपटीबार उडवला असताना त्यांच्यावर आणखी एका सहकाऱ्याने तोफ डागून अडचणीत आणले आहे. हातकणंगले मध्ये जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांचा अर्ज भरताना शेट्टी उपस्थित होते. पण मिणचेकर यांना सोबत घेतल्यावर कांबळे यांचे पंख आपोआप कापले गेले आहेत. हि भळभळती जखम सोसवत कांबळे यांनी पैशाच्या पेट्यासाठी राजू शेट्टी यांनी चळवळ विक्रीला काढताना सामान्य कार्यकर्त्याचा बळी दिला आहे, असा आरोप करून त्यांचे पुरते वस्त्रहरण करण्याचा इशारा दिला आहे.