नीलेश पानमंद, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे महापालिकेने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम रविवारी आयोजित केला होता. शहरात तीनशे ठिकाणी राबविलेल्या या उपक्रमात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाल्याने शिवसेनेकडून हा उपक्रमच हायजॅक करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ‘स्वच्छता ही सेवा’ हे अनोखे अभियान जाहीर केले आहे. हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमधील तीनशे ठिकाणी रविवारी सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान हा उपक्रम पालिकेने आयोजित केला होता. या उपक्रमाची सुरुवात आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत माजिवडा उड्डाणपूलाखाली असलेल्या तिरंगा चौकातून झाली. त्याचबरोबर शहरात तीनशे ठिकाणी हा उपक्रम राबवून श्रमदानाने परिसर स्वच्छ करण्यात आला.

आणखी वाचा-राजद पक्षाचे नेते अब्दुल सिद्दीकी यांच्या महिला आरक्षणावरील विधानामुळे नवा वाद; भाजपाची टीका

ठाणे महापालिकेवर शिवसेनेची अनेक वर्षे सत्ता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून पालिकेचे कामकाज सुरू आहे. यामुळे शिवसेनेतील फुटीनंतरही पालिकेवर शिंदे यांचे वर्चस्व आहे. अनेक कार्यक्रमांमधून हे चित्र दिसून आले असून रविवारी पार पडलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातही हे चित्र दिसून आले. हा उपक्रमसाठी यशस्वी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी माजी नगरसेवकांची आयुक्तांसोबत तीन दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. त्याचबरोबर पक्षाचे विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांना स्वच्छतेसाठी ठिकाण निवडून दिली होती. शिवाय, विविध सत्संगचे सेवक, महाविद्यालय विद्यार्थी यांनाही उपक्रमात सामील करून घेतले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेले कार्यक्रम भाजपकडून मोठ्याप्रमाणात राबविले जातात. पण, या कार्यक्रमात मात्र भाजपपेक्षा शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर असल्याचे दिसून आले. भाजपचे आमदार संजय केळकर आणि काही पदाधिकारी या उपक्रमात सामील झाले असले तरी सर्वच ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपक्रमात उतरल्याचे दिसून आले. अगदी उपक्रमाच्या नियोजनापासून ते सहभागापर्यंत शिवसेना सहभागी झाल्याने हा उपक्रम त्यांनी हायजॅक केल्याचे दिसून आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कार्यक्रम आखून दिला होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हा एक उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे काम आम्ही केले या कार्यक्रमाला कोणीही पक्षी दृष्टिकोनातून पाहून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. -नरेश म्हस्के, शिवसेना राज्य प्रवक्ते

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swachhata hi seva initiative hijacked by shiv sena in thane print politics news mrj