बिहारमध्ये आरजेडीचे नेते आणि शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानसबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला होता. आता भाजपाने शांतता बाळगली आहे. अशात समाजवादी पक्षातील मागास वर्गाचं नेतृत्व करणारे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचंही एक वक्तव्य समोर आलं आहे. रामचरितमानस बकवास आणि दलितविरोधी आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मात्र समाजवादी पक्ष याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे की धर्म कुठलाही असो आम्ही त्या धर्माचा सन्मानच करतो. मात्र धर्माच्या नावावर विशिष्ट जात आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना अपमानित करण्यात आलं आहे. आमचा आक्षेप हा याच गोष्टीवर आहे. रामचरितमानसमध्ये एक चौपाई लिहिली आहे, त्यामध्ये तुलसीदास म्हणतात की शूद्र हे अधम जातीचे आहेत. यापुढे तुलसीदास म्हणतात की ब्राह्मण दुराचारी, निरक्षर असला तरीही तो ब्राह्मण आहे आणि त्यामुळे तो पूजनीय आहे. मात्र शूद्र हा किती ज्ञानी, विद्वान असला तरीही त्याचा सन्मान करू नका. जर असं त्यांचं म्हणणं असेल तर मी अशा धर्माला नमस्कार करतो आणि ही आशा बाळगतो की या धर्माचा सत्यानाश होईल कारण हा धर्म आमचा सत्यानाश करू पाहतो आहे. असंही मौर्य यांनी म्हटलं आहे. आज तकला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

समाजवादी पक्षाने रामप्रसाद मौर्य यांच्या या वक्तव्यावस सोयीस्कर मौन बाळगलं आहे. कारण पक्षाला असं वाटतं आहे की या वक्तव्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली एक बाजू ही धार्मिक आहे तर दुसरी बाजू ही सामाजिक आहे. समाजवादी पक्षातंर्गत दोन्ही बाजूंचा विचार होतो आहे. पक्षाला एकीकडे असं वाटतं आहे की अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान होऊ शकतं. तर दुसरीकडे असं वाटतं आहे की जे काही लिहिलं गेलं आहे त्यावर वाद आणि चर्चा होत असेल तर होऊ द्यावी या निमित्ताने दलित वर्ग चर्चा करण्यासाठी पुढे येत असेल त्यात गैर काहीही नाही.

समाजवादीचे आमदार मनोज पांडे यांचं मत वेगळं आहे ते म्हणतात की रामचरितमानस हा महान धर्मग्रंथ आहे. त्यांचं म्हणणं आहे की या मुद्द्यावर स्वामी प्रसाद मौर्य हे राजकारण करू पाहात आहेत. मनोज पांडे हे ब्राह्मण समुदायाचं नेतृत्व करतात. तर स्वामी प्रसाद मौर्य हे दलित वर्गाचं नेतृत्व करतात. या सगळ्या विषयावर अखिलेश यादव यांनी काहीही भूमिका घेतलेली नाही. सूचक मौन बाळगलं आहे याचं आश्चर्य मात्र नक्कीच व्यक्त होतं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami prasad maurya ramcharitmanas statement akhilesh yadav silent political benefits scj