समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य हे एकामागून एक वादग्रस्त विधाने करून हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करत असताना पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव मौन बाळगून आहेत. यामुळे समाजवादी पक्षात अस्वस्थता वाढली असून अनेकांचे म्हणणे आहे की, हा पक्षाच्या रणनीतीचा भाग आहे. ओबीसी समाजावर असलेली भाजपाची पकड सैल करणे आणि त्याच वेळी पक्षाच्या मुस्लीम-यादव मतपेटीलाही कुरवाळणे, असे दुहेरी हेतू या माध्यमातून साध्य केले जात आहेत.
मौर्य यांनी वर्षाच्या सुरुवातीला रामचरितमानसवर वादग्रस्त वक्तव्य करून हिंदुत्ववाद्यांचा रोष ओढवून घेतला होता. आता रविवारी (१५ ऑक्टोबर) त्यांनी आणखी एक वक्तव्य करून वादाला तोंड फोडले. भारताच्या फाळणीला मोहम्मद अली जिना कारणीभूत नसून हिंदू महासभा जबाबदार आहे, असे ते म्हणाले. यानंतर भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांनी माजी मंत्री असलेल्या मौर्य यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले, तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याबाबत मौन बाळगल्याबद्दल त्यांच्यावरही टीका केली.
हे वाचा >> लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने कसली कंबर; पक्षाच्या वेगवेगळ्या विभागांची पुनर्रचना!
मौर्य यांचे नाव न घेता समाजवादी पक्षाचे आमदार मनोज कुमार पांडे यांनी द इंडियन एक्सप्रेसला प्रतिक्रिया देताना म्हटले, “एखाद्याची मानसिक स्थिती बिघडली असेल तर त्याकडे मानवी दृष्टिकोनातून पाहत त्याला व्यवस्थित हाताळले पाहिजे. जी वादग्रस्त वक्तव्ये समोर येत आहेत, ती पक्षाच्या ध्येय-धोरणाशी विसंगत आहेत. लोहिया, मुलायम सिंह यादव किंवा विद्यमान अध्यक्ष अखिलेश यादव या सर्वांनीच सर्वधर्म समभाव ही वृत्ती जोपासली. कुणाच्याही श्रद्धा किंवा धर्मावर झालेला हल्ला समाजवादी पक्षाला मान्य नाही. जर कुणी राजकीयदृष्ट्या कमकुवत असेल तर त्यांनी इतर धर्मावर टीका करण्यापेक्षा दुसरा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. समाजवादी पक्षाची खरी लढाई बेरोजगारीविरोधात आहे.”
समाजवादी पक्षाच्या आणखी एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मौर्य यांची विधाने ही रणनीतीचा भाग आहेत. ब्राह्मण वगळता भाजपाच्या हिंदुत्ववादाच्या संकल्पनेत इतर कुणालाही जागा नाही. आपण मागच्या काही निवडणुकांमध्ये पाहिले की, भाजपाने हिंदुत्वाच्या नावावर सर्व जातींना एकत्र करून त्यांची मते मिळवली. ओबीसी, दलित आणि शीख यांना हिंदू धर्मात फारसे स्थान नाही, हे दाखवून देण्यासाठी अशाप्रकारची विधाने मदत करतात आणि या माध्यमातून ओबीसी, दलित आणि त्यांच्या उपजातीमधील मतांची पुन्हा एकदा विभागणी करणे शक्य होते.
विरोधकांवर टीका करताना भाजपाचे उत्तर प्रदेश उपाध्यक्ष विजय बहादूर पाठक म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य ज्या प्रकारची विधाने करत आहेत आणि त्यावर त्यांचे नेते अखिलेश यादव मौन बाळगून बसले आहेत, यावरून दोन शक्यता दिसतात. एकतर, समाजवादी पक्ष संभ्रमावस्थेत आहे आणि या विधानाचा काय अर्थ होतो, हेच त्यांना माहीत नाही. दुसरे असे की, भूतकाळात अशाचप्रकारची रणनीती आखून समाजातील विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न सपाने केला होता. मुलायम सिंह यादव यांनी भूतकाळात राबविलेली रणनीती आता अखिलेश यादव अवलंबवत आहेत.
आणखी वाचा >> रामचरितमानसवरून पुन्हा एकदा JDU-RJD आमनेसामने; जेडीयूचा नेता म्हणाला, “आता कुराण आणि बायबल…”
मौर्य यांची आधीची वादग्रस्त विधाने
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मौर्य यांनी भाजपामधून समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. या वर्षाच्या सुरुवातीला रामचरीतमानसमधील काही भागावर त्यांनी टीका करत तो भाग ग्रंथातून वगळण्याची मागणी केली.
मागच्या महिन्यात जेव्हा सनातन धर्मावरून वादविवाद सुरू होता, तेव्हा या वादात मौर्य यांनीही उडी घेतली. हिंदू हा फक्त ब्राह्मणांचा धर्म असल्याचे ते म्हणाले. “हिंदू धर्म अस्तित्वात नाही, हिंदू धर्म म्हणजे फसवणूक आहे. खरे सांगायचे तर ब्राह्मण धर्मालाच हिंदू धर्म सांगून त्या माध्यमातून देशातील दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला गेला. जर हिंदू धर्मासारखी बाब अस्तित्त्वात असती तर दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा त्यात आदर राखला गेला असता.”