सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेतील फुटीला मराठवाड्यातून नऊ आमदार आणि एक खासदाराचे बळ मिळाले. त्यानंतर ‘खोके’ आणि ‘गद्दार’ शब्दांच्या आधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला सहानुभूतीही मिळाली. मात्र, फूट झालेल्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व विकसित करण्यास ठाकरे गटाला फारसे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक मतदारसंघात पर्यायी नेतृत्व कोणाकडे द्यावे याची वारंवार चाचपणी केली जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर ही प्रक्रिया कमालीची संथ असल्याने मराठवाड्यातील नऊ मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या सभा दणदणीत झाल्या खऱ्या, पण त्यानंतर स्थानिक पातळीवर आंदोलने उभी राहताना दिसली नाहीत.

 दहा महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील तानाजी सावंत (परंडा), संदीपान भुमरे (पैठण), अब्दुल सत्तार (सिल्लोड) , प्रा.रमेश बोरनारे (वैजापूर), संजय शिरसाट (छत्रपती संभाजीनगर पश्चिम), प्रदीप जैस्वाल (छत्रपती संभाजीनगर मध्य), बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर),  ज्ञानेश्वर चौगुले (उमरगा), संतोष बांगर (हिंगोली) यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नाकारले. त्यांनर भाजपबरोबरच्या युती सरकारमध्ये तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. पहिल्या टप्प्यात या नेत्यांच्या विरोधात वातावरण निर्माण होत असल्याचे ठाकरे गटाच्या सभांमधून दिसून येत हाेते. 

हेही वाचा >>> ठाकरेंच्या सभेने जळगावमध्ये शिवसैनिकांना बळ

कुरघोडीच्या राजकारणातून धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत ग्रामीण भागात सहानुभूती निर्माण झाली. मात्र, या सहानुभूतीतून स्थानिक पातळीवर नेतृत्व होण्याची प्रक्रिया कमालीची संथ असल्याचे मानले जात आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेतेही ही बाब मान्य करत आहेत. परंडा मतदारसंघात ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे पर्यायी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे तर उमरगा मतदारसंघात ज्ञानेश्वर पाटील यांच्या विरोधात पर्याय सापडलेला नाही. सिल्लोड मतदारसंघात अद्यापि कोण कार्यकर्ता उमेदवारी दाखल करू शकेल याचे नावही ठाकरे गटातील नेत्यांना सांगता येत नाहीत. ‘या नेत्यांना हरविण्यासाठी सामान्य माणूसच पुरेसा आहे’ अशी मांडणी केली जात आहे. या अनुषंगाने बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘अनेक मतदारसंघात ही प्रक्रिया सुरू आहे. तरुण आणि आश्वासक चेहरे येत्या काळात नेतृत्व करतील. तशीच आखणी केली जात आहे.’

हेही वाचा >>> कर्नाटकातील भाजपच्या उत्साही नेत्यांना अमित शहा यांनी लावला चाप

 जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भाऊसाहेब चिकटगावकर, गंगापूरमधून कृष्णा पाटील डोणगावकर, छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघासाठी किशनचंद तनवाणी, नंदकुमार घोडेले, बाळासाहेब थोरात अशी नावे चर्चेत आणली जात आहेत. पण शहरातील संजय शिरसाट  यांच्या मतदारसंघासाठी अद्यापि स्थानिक पातळीवर शिवसेनेची संभाव्य उमेदवारासाठी योग्य नाव चर्चेत देखील पुढे येत नाही. काही मतदारसंघात ऐनवेळी भाजपमधील उमेदवार येऊ शकतील, असाही अंदाज बांधला जात आहे. सभा मोठ्या, चर्चेतून येणाऱ्या सहानुभूतीची लाट अद्यापि कायम असली तरी स्थानिक पातळीवर नेतृत्व विकास संथगतीने असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> मराठा आरक्षणावरून विदर्भात ओबीसी समाजात संतप्त प्रतिक्रिया

 फुटीनंतर सध्या उद्धव ठाकरे गटात मराठवाड्यात बंडू जाधव व ओम राजेनिंबाळकर हे दोन खासदार आणि कैलास पाटील, उदयसिंह राजपूत आणि डॉ. राहुल पाटील हे तीन आमदार एवढीच ताकद उरली. नव्याने मतदारसंघ बांधणीसाठी ठाकरे गटाच्या सभांना गर्दी झाली तरी फूट झालेल्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर नेतृत्व विकासाकडे उद्धव ठाकरे गटाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. बीड, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद तशी कमी होतीच. फुटीनंतर या जिल्ह्यातील संघटनात्मक ताकदही पद्धतशीरपणे भाजपच्या बाजूने वळविण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यात संघटन वाढविण्यासाठी केवळ उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या सभांवर पुन्हा किती संघटन उभे राहील यावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sympathy for uddhav thackeray leadership local level no success print politics news ysh
Show comments