२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेससह सर्व पक्ष आपापल्या राजकीय तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सातत्याने आपले मित्र पक्ष वाढवत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये भाजपा, पवन कल्याण यांचा पक्ष जनसेना आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. खरं तर TDP पूर्वीपासून एनडीएचा भाग आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि YSRCP अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरत आहे.
पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात संसदेच्या नवीन इमारतीत झालेल्या चर्चेनंतर जगनमोहन यांची मोदींबरोबरची भेट योगायोगाने झाली आहे. जगनमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी संसदेच्या संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली. विशेष श्रेणीचा दर्जा ही आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यातील तरतुदींपैकी एक आहे, ज्याद्वारे जून २०१४ मध्ये स्वतंत्र तेलंगणा राज्याची स्थापना झाली. याशिवाय राज्यातील प्रलंबित योजनांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. परंतु टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांचंसुद्धा या घटनेवर बारीक लक्ष असू शकते, कारण गेल्या काही दिवसांपासून चंद्राबाबू नायडूही राष्ट्रीय राजधानीत आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी शाह यांची भेटसुद्धा घेतली आहे. भाजपाने आंध्र प्रदेशमध्ये एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी टीडीपी आणि त्यांचा सहयोगी जनता सेना पक्षा (जेएसपी) बरोबर करार केला आहे.
दुसरीकडे YSRCP च्या नेतृत्वाखालील जगनमोहन सरकारने जवळपास प्रत्येक गंभीर प्रसंगी केंद्रातील भाजपाला त्यांच्या उपक्रमांवर पाठिंबा दिला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वीच जगनमोहन यांच्या पक्षाने औपचारिक युती मागे घेतल्याने भाजपामधील एक गट त्यांच्याबद्दल नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला राज्यातील अल्पसंख्याकांचा पाठिंबा आहे, त्यामुळे भाजपा त्यांच्याबरोबर युती करण्यास उत्सुक होता. पुढील लोकसभा निवडणुकीत कोणताही पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेवर येऊ नये, अशी जगनमोहन रेड्डी यांची इच्छा आहे, कारण असे झाल्यास राज्यांमध्ये सौदेबाजीची शक्यता वाढते.
जगनमोहन रेड्डी यांचा पक्षसुद्धा भाजपाच्या उजव्या बाजूने जाण्यास तयार असल्याचं समजतंय. त्यांच्या नेत्यांनी सांगितले की, भाजपानेटीडीपी-जेएसपीशी युती केली तरीही आमचा पक्ष भाजपावर हल्ला करणार नाही. आमच्याकडे समान अंतराचे योग्य धोरण आहे,” असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. खरं तर भाजपाला विरोध केल्यास केंद्रीय एजन्सींच्या त्रासाचा सामना करावा लागू शकते हे जगनमोहन रेड्डींना माहीत आहे. भाजपाला विरोध केल्यास पक्षाच्या नेत्यांना त्याचा त्रास होऊ शकतो हे जगनमोहन रेड्डी ओळखून आहेत.
भाजपा आणि तेलुगु देसम पक्ष पुन्हा एकदा एकत्र निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरही चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. याबरोबरच भाजपा पवन कल्याण यांचा पक्ष जनसेनाबरोबर आहे. अशा स्थितीत आंध्र प्रदेशातील आगामी निवडणुका रंजक ठरू शकतात. अलीकडेच चंद्राबाबू नायडू यांनीही दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. आंध्र प्रदेशात भाजपाला ६ किंवा ७ जागा मिळू शकतात. त्याचबरोबर चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला युतीत २ जागा दिल्या जाऊ शकतात. आंध्र प्रदेशमध्ये २०२४ मध्ये विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात. २०१९ मध्ये झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला होता. वायएसआर काँग्रेसने राज्यातील १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी लोकसभेच्या २५ जागांपैकी जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने २२ जागांवर कब्जा मिळवला होता.