विश्वास पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार घेऊन पक्षनेतृत्वाविरोधात बंड पुकारल्याची माहिती जशी बाहेर आली तशी अन्य जगापेक्षाही सातारा जिलह्यातील दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) गावात मात्र खळबळ उडाली. या गावचे ग्रामस्थ मंगळवारी दिवसभर दूरचित्रवाणी संच आणि भ्रमणध्वनीवर अडकून पडले होते. डोंगरदरीतील या गावात ही एवढी उत्सुकता असण्याचे कारण म्हणजे या लक्षवेधी बंडाचे नेतृत्व करत असलेल्या एकनाथ संभाजी शिंदे यांचे हे मूळ गाव. एरवी गावच्या प्रत्येक अडीअडचणीसाठी धावून येणाऱ्या आपल्या गावच्या या पुत्राचा राजकीय प्रवास सुखकर व्हावा हीच भावना प्रत्येकाकडून व्यक्त होत होती.

दरे तर्फ तांब हे महाबळेश्वर तालुक्यात कोयनाकाठच्या परिसरातील एक छोटेसे गाव. शिंदे यांचे हे मूळ गाव आहे. त्यांची वडिलोपार्जित शेती, घर, चुलतभाऊ, अन्य नातेवाईक, भाऊबंद या गावात आजही राहतात. गावातील अनेक लोक उद्योग धंदानिमित्त मुंबईमध्ये स्थलांतरित झाले. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय असेच ठाणे येथे स्थलांतरित झाले. शिंदे यांचा जन्म यानंतरच ठाणे येथे झाला. तर प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण देखील ठाण्यात झाले. या दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांसमवेत ते गावात येत राहिले आणि यातूनच त्यांचे गावाशी असलेले नातेही घट्ट होत गेले.

शिंदे पुढे शिवसैनिक, मग शिवसेना नेते, मंत्री असा त्यांचा प्रवास घडला तरी त्यांचे गावाशी असलेले नाते आजही कायम आहे. ते गावी येतात तेव्हा गावाला अक्षरश: मिनी मंत्रालयाचे स्वरूप येते. मंत्रिपदाची झूल बाजूला सारून शिंदे आपले पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत स्वतःच्या शिवारात फेरफटका मारून शेतीत कामही करतात. आपल्या गावातील ग्रामस्थ एकनाथ संभाजी शिंदे हे मोठे नेते व मंत्री असल्याचा गावकऱ्यांना अभिमान वाटतो. या परिसरातील अनेक जण आजही व पिढ्यान् पिढ्या शिवसेना संघटनेच्या कामात, नियमित संपर्कात व मोठ्या पदावर काम करत आहेत. दरे तर्फ तांब गावचे ग्रामदैवत उत्तरेश्वर यात्रेनिमित्त एकनाथ शिंदे हे गावी नेहमी येतात. ते आले की त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची रीघ लागलेली असते.दरम्यान शिंदे यांनी आज अनेक आमदारांसह शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारले असल्याची माहिती समजताच गावकऱ्यांना एकच धक्का बसला.

गटाने लोक एकत्र येऊन या विषयाची चर्चा करत होते. ते असे काही करू शकतील याबद्दल लोक साशंक होते. ‘एकनाथ शिंदे शिवसेना सोडतील असे वाटत नाही’, ‘कडवे शिवसैनिक असल्याने ते हिंदुत्व सोडणार नाहीत’ इथपासून ते ‘आमच्या गावच्या या पुत्राचा राजकीय प्रवास सुखकर व्हावा’ इथपर्यंत अशा अनेक प्रतिक्रिया दिवसभर उमटत होत्या. मात्र काहीही झाले तरी आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे मत दरेचे शिवसेना शाखाप्रमुख बाबुराव शिंदे, तापोळाचे सरपंच आनंद धनावडे, वेळापूरचे सरपंच राम सपकाळ यांनी व्यक्त केले. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातच नव्हेतर देशात चर्चेला उधाण आले असताना कोयनेच्या खोऱ्यातील या छोट्याशा गावात उमटत असलेल्या या भावनांनाही तेवढेच महत्त्व आले होते.