मधु कांबळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेस हा तसा महत्त्वाचा पक्ष. त्यातील मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे व त्यांचे पुत्र सत्यजित तांबे हे एक किरकोळ बिंदू. परंतु त्यांनी केलेल्या राजकीय प्रतापाने साऱ्या महाराष्ट्राचे राजकारण व्यापून गेले. त्यात काँग्रेसची अवस्था फारच दीनवाणी झाली. २०१४ नंतर सत्तेवरुन पाय उतार झाल्यानंतर, कुपोषित बालकासाराखी काँग्रेसची अवस्था झाली. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांचीच कृपा म्हणायची, त्यांना मुख्यंमत्री होण्याची महत्त्वकांक्षा स्वस्त बसू देईना, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली, ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेसच्या ताटात सत्तेची चतकोर भाकरी पडली. त्यातून जरा कुठे काँग्रेसला उभारी येत असतानाच, सत्तेचे ताट भाजपने हिसकावून घेतले आणि पुन्हा काँग्रेसला सत्तेशिवाय उपाशी राहण्याची वेळ आली. मग ज्यांना प्रत्यक्ष सत्तेचे सोऩ्याचे घास मिळाले आणि ज्यांना अप्रत्यक्ष सत्तेची उब मिळाली, त्यांना सत्तेची अधिकची भूक लागणे स्वाभाविक आहे. ती भूक भागविण्यासाठी तांबे पितापुत्रांच्या बंडाकडे म्हणा किंवा फितुरीकडे बघावे लागेल.

राजकारणात खासदार, आमदार, नगरसेवकपदाची उमेदवारी मिळाली नाही की, बंडखोरी करुन निवडणुका लढविणे, त्यातील काहीजण जिंकणे हे काही महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. ज्या तांबे पिता पुत्रांच्या बंडामुळे ज्यांची पक्षातच मोठी कोंडी झाली ते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या आमदारकीची सुरुवातही अशीच बंड करुन झालेली होती.१९८५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारली गेली होती, परंतु त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व जिंकली. तेव्हापासून आजतागायत अनेक राजकीय पडझडी झाल्या, परंतु थोरातांनी आपला गड कायम राखला. परंतु त्यांनी पक्षावरील निष्ठा कधी ढळू दिली नाही. आज महाराष्ट्रातील काँग्रेसचे ते प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्याची तुलना सुधीर तांबे व सत्यजित तांबे यांच्या बंडाशी करता येणार नाही. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काँग्रेसच्या एकूण राजकारणातील तांबे पितापुत्र हे लहानसा बिंदू असले, तरी त्या बंडामागे असणारे हात आणि बाळासाहेब थोरात यांचे नातेसंबंध, त्यामुळे त्याची चर्चा राज्यभर सुरु झाली आहे.

हेही वाचा… औरंगाबाद शिक्षकमधील दोन्ही उमेदवार श्रीमंत

डॉ. सुधीर तांबे नाशिक मतदारसंघातून तीन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते. अर्थात पहिल्यांदा त्यांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविली होती, पुढे दोनदा ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राहिले. या वेळी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, परंतु ऐनवेळी त्यांनी स्वतः अर्ज न भरता आपले पुत्र सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून अर्ज भरायला लावला. हा काँग्रेसला मोठा धक्काच नव्हे तर, पक्षाची नाचक्की होती. पक्षाने सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर करायची आणि त्यांनी अर्जच दाखल करायचा नाही, त्याऐवजी मुलाला अर्ज भरायला लावणे हा काँग्रेसच्या पक्षाध्यक्षाचाही अपमान आहे. काँग्रेसमध्ये राहिल्याने तांबे पितापुत्रांना अगदीच काही मिळाले नाही असे नाही. सुधीर तांबे तीन वेळा आमदार. मुलगा सत्यजित तांबे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले होते. विधानसभा निवडणुकीत आमदारकीची उमेदवारीही दिली होती, ते लढले परंतु हारले. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. शिवाय राज्याच्या सत्तेत महत्त्वाच्या स्थानी असलेल्या बाळासाहेब थोरातांचा आपले मेहुणे म्हणून सुधीर तांबे व भाचे म्हणून सत्यजित यांच्यावर राजकीय वरदहस्त होताच. तरीही हे असे का घडले. त्याची कारणे पक्षात आणि पक्षाच्या बाहेरही आहेत, अशी चर्चा आहे. ज्या पक्षाची सत्ता असते, त्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना लहान मोठ्या शासकीय समित्या, कंत्राटे दिली जातात, त्यातून त्यांचे आर्थिक चांगभले होते. अलीकडे काँग्रेसमध्ये सत्तेचे पाणी वरच अडवून ठेवले गेले ते खाली पाझरत नव्हते, त्यामुळे सत्तेची तहान लागलेले सत्यजित तांबे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर कुणी सत्तेच्या पाण्याचा पेला दाखविला तरी तिकडे ते पळणारच. तांबे पिता पुत्राने जे काही बंड वगैरे केले हा त्यातला प्रकार असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा… बीड जिल्ह्यातील देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापासून मुंडे भगिनी पुन्हा दूर

बरे हे सगळे पूर्वनियोजित काही नव्हते असे म्हणता येणार नाही. म्हणजे, भाजपने अधिकृत उमेदवारच न देणे, सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज न भरणे, त्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करणे, त्यानंतरही आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचा आव आणणे आणि भाजपचाही जाहीरपणे पाठिंबा मागणे व तो देण्याची भाजपने तयारी दर्शविणे, हे सगळे ठरल्याप्रमाणेच घडले नाही असे कोण म्हणेल. तांबे पिता पुत्रांनी काँग्रेसची अशी अवस्था करुन टाकली की त्यांना दुसरा उमेदवारही देता आला नाही कारण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी हे सारे नाट्य घडले. झोपेत डोक्यात दगड घालावा तसा प्रकार तांबे पितापुत्रांनी स्वपक्षासोबत केल्याचा राग आणि खंत पक्षातून व्यक्त होत आहे. शेवटी आपल्या मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्या हतबल झालेल्या काँग्रेसला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे हेच पुढे सरसावले. त्यांनी नागपूरमधील आपला उमेदवार मागे घेतला व ती जागा काँग्रेसला दिली. नाशिकमध्ये त्यांनी भाजपने डावलेल्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनेही संमती दिली. ठाकरे यांनी नाशिकमध्ये निवडणुकी आधीच कोसळलेली महाविकास आघाडी पुन्हा उभी तर केलीच, परंतु काँग्रेसची लाजही राखली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

हेही वाचा… पंतप्रधान मोदींच्या शासकीय समारंभांचा राजकीय वापर? विरोधकांचा आक्षेप

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ३० जानेवारीला निवडणूक होईल. त्यात नाशिकमधील लढतीवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत होईल. खरे म्हणजे तांबे पितापुत्रांनी जे बंड केले, त्याचा तसा महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. निवडणुका झाल्या, निकाल लागला की हा विषय संपेल. परंतु प्रश्न आहे तो काँग्रेसच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा.

हेही वाचा… नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजीत तांबेंना ‘या’ दोन शिक्षक संघटनांचा पाठिंबा

देशातच काँग्रेसची अवस्था खंगत चालेल्या बालकासारखी होत असताना, पक्षाला पुन्हा उभारी देण्याकरिता राहुल गांधी देश पालथा घालत आहेत. देशावर येऊ घातलेल्या हुकुमशाहीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी निधड्या छातीने ते मैदानात उतरले आहेत. नफरत छोडो, भारत जोडो या त्यांच्या भूमिकेचे देशभरातील लोकशाहीवादी संघटना, पक्ष, नागरी संस्था यांच्याकडून स्वागत होत आहे. महाराष्ट्रातही राहुल गांधी यांच्या तीन आठवड्यांच्या पदयात्रेने मोठा झंजावात निर्माण केला. काँग्रेसनेही काहीशी मरगळ झटकली, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, आगामी निवडणुकांच्या निमित्ताने राहुल गांधी काँग्रेस पक्षाला लढ्यासाठी सज्ज करीत असताना, तांबे पितापुत्राने केलेला दगफटका पक्षाला पुन्हा पिछाडीवर नेणारा आहे. मुळात राहुल गांधी जी भूमिका घेऊन सारा देश पायी चालत पादाक्रांत करीत आहे, ती त्यांची भूमिका काँग्रेसलावल्याना तरी मान्य आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. काँग्रेसची सुभेदार घराणी अशीच सत्तेसाठी, फितुरी, दगाबाजी करणार असतील तर, काँग्रेसच्या बाहेरचा परंतु काँग्रेसचा सहानुभूतीधारक वर्ग आहे, तो तुमच्या जवळ कशासाठी येईल. इतके वर्षे सत्ता भोगल्यानंतरही थोडीही त्यागाची तयारी नसेल तर, राहुल गांधी यांचे रक्त आटवणारे कष्ट निरर्थक ठरणार आहेत. याची जाणीव नसेल आणि केवळ आपल्या घराण्याठी, कुटुंबासाठीच राजकारण केले जाणार असेल तर, काँग्रेस आणखी खड्ड्यात जाणार आहे, त्यासाठी कोणत्या भविष्यवाणीची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tambe family wants to remain in power print politics new asj