तामिळनाडूमध्ये स्थलांतरीत मजूरांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. त्याला कारण बनले मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नावाने पसरलेली एक खोटी बातमी. ही बातमी व्हायरल होऊन गोंधळ माजल्यानंतर आता तामिळनाडू सरकारने उत्तर प्रदेशमधील एक भाजपा नेता आणि दैनिक भास्कर यांच्या संपादकांसह दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडूमध्ये उत्तर भारतीय स्थलांतरीत मजूरांवर हल्ले होत असल्याबाबतचे खोटे आणि निराधार वृत्त दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन स्वतंत्र तक्रारी करुन तीन जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपाचे प्रवक्ते आणि गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील सल्लागार म्हणून काम करणारे प्रशांत उमराव यांच्यासह दैनिक भास्करचे संपादक (नाव जाहीर केलेले नाही) आणि बिहारमधील पत्रकार मोहम्मद तनवीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी तामिळनाडू पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. तसेच तामिळनाडू सरकारतर्फे शनिवारी एक निवेदन काढून सांगितले की, सर्व उत्तर भारतीय कामगार तामिळनाडूमध्ये शांततेत राहत आहेत.

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे आवाहन

तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी देखील एक निवेदन काढून सांगितले की, राज्य सरकार आणि राज्यातील जनता स्थलांतरीत कामगारांच्या बांधवांना सरंक्षण प्रदान करेल. तामिळनाडू राज्य आदरातिथ्यासाठी ओळखले जाते, आम्ही सर्वांचेच स्वागत करतो. काही लोकांना तामिळनाडूमधील शांतता आणि सलोखा पाहावत नाही. त्यामुळे ते राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते यात यशस्वी होणार नाहीत. तसेच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संवाद साधून आश्वासन दिले की, तामिळनाडू सरकार त्यांच्या राज्यातील कामगारांसोबत कोणताही अनुचित प्रकार होऊ देणार नाहीत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी मात्र हल्ल्याचे आरोप नाकारले आहेत. ते म्हणाले, आपण या घटनेकडे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून पाहिले पाहीजे. बिहारचे भाजपा प्रमुख यांनी मला फोन करुन याबाबत विचारणा केली. मी त्यांना म्हणालो की तामिळनाडूमध्ये असा कोणताच प्रकार घडलेला नाही. तसेच तामिळनाडू पोलीस स्थलांतरीत मजूरांना आवश्यक ते सरंक्षण प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांना आश्वासित केले.

पोलिसांच्या तपासात सत्य समोर आले

तामिळनाडू पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांच्या प्राथमिक तपासातून असे दिसले की, उत्तर भारतीय मजुरांवरील हल्ल्याबाबतच्या बिनबुडाच्या खोट्या बातम्या या राजकीय हेतू ठेवून पसरविण्यात आल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या वाढदिवासाशी (१ मार्च) त्याचा जवळचा संबंध आहे. बिहारचे उपमुख्यंत्री तेजस्वी यादव यांच्यासह अनेक विरोधक स्टॅलिन यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपाविरोधी आघाडी उघडण्याबाबत चर्चा करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, तीनही कथित आरोपींनी मजूरांवरील हल्ल्याचा संबंध मुख्यंमत्र्यांच्या वाढदिवसाशी जोडला. भाजपा नेते उमराव यांना ट्विटरवर खूप सारे फॉलोअर्स आहेत. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, हिंदी भाषेत बोलल्याबद्दल १२ बिहारी मजूरांना फाशी देण्यात आली होती. या ट्विटसोबत त्यांनी स्टॅलिन आणि तेजस्वी यादव यांचा एकत्रित फोटो पोस्ट केला होता. पोलीस म्हणाले की, आरोपी दोन पत्रकारांनीही त्याच दिवशी ही अफवा पसरविली. तिघांवरही भारतीय दंड विधान कायद्यातंर्गत शत्रूत्व आणि असंतोष वाढविण्यासंबंधी गुन्हा दाखल केला आहे.

तामिळनाडूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, डीएमके पक्षाच्या रॅलीनंतर दुसऱ्या दिवशी ही अफवा पसरली. दैनिक भास्करच्या वेबसाईटवर पहिल्यांदा ही बातमी दिसली. त्यानंतर त्यांच्या दैनिकात देखील ही बातमी छापून आली. मात्र तनवीरने जेव्हा उत्तर भारतीय कामगारांवर तामिळ लोकांनी हल्ला केल्याच्या वृत्ताबाबतची ट्विट्समालिका पोस्ट करायला सुरुवात केली, त्यानंतर हे प्रकरण तापले. तनवीरनेदेखील १२ लोकांना फाशी दिल्याची खोटी बातमी पोस्ट केली होती. स्थलांतरीत मजूरांच्या व्हॉट्सअप ग्रपुवर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर मजूरांमध्ये चलबिचल सुरू झाली. उत्तर भारतातील अनेक टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांनी ही बातमी चालवली. बिहारमधील भाजपा नेत्यांनी देखील तेजस्वी यादव स्टॅलिनच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सामील झाल्याचा मुद्दा उचलून धरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाच्या डझनभर व्हेरिफाईड ट्विटर हँडलवरुन ही खोटी बातमी पसरवली गेली. या हँडल्सना लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. या पोस्टबाबत विचारल्यानंतर बिहार भाजपाचे प्रवक्ते निखील आनंद म्हणाले की, तेजस्वी यादव चेन्नईमध्ये स्टॅलिन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खासगी विमानाने गेले. आम्हाला त्याबाबत तक्रार नाही. पण केक खाल्ल्यानंतर ते तामिळनाडूच्या बाजूने आणि बिहार तसेच बिहारच्या जनतेविरोधात बोलायला का लागले? निखील आनंद तामिळनाडू पोलिसांवर देखील आरोप केला आहे. पोलिसांनी हल्ल्याचे आरोप फेटाळून लावण्याऐवजी त्यांनी योग्य चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. तामिळनाडूतील भाजपा नेत्याने सांगितले की, उमराव यांनी आपले ट्विट डिलीट केले आहेत. तसेच ही एक संघटीत मोहीम होती, असे मला वाटत नाही.

चेन्नईतील एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की बिहारमधील एक शिष्टमंडळ तामिळनाडुच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची भेट घ्यायला येणार आहे. या प्रकरणाचा जवळून तपास करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “बाहेरील राज्यातून रोजगारासाठी आलेल्या कामगारांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. अफरातफरी माजवण्यासाठीच अफवा पसरविण्यात आल्या, हे आता तपासाअंती समोर आले आहे. स्थलांतरीत मजूर आता आपल्या मुळ गावी जात आहेत, त्याचे कारण म्हणजे होळी आणि इतर सणांचे औचित्य आहे. त्यामुळे मजूरांच्या स्थलांतरामागे कोणतेही इतर कारण नाही.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil nadu police book bjp leader 2 journalists over false reports of attacks on migrants kvg