तामिळनाडू राज्याच्या भाजपा पक्षाची धुरा हातात घेऊन के. अन्नामलाई यांना आता दोन वर्षे होत आहेत. या दोन वर्षांत ते बातमीत दिसले नाहीत, असे क्वचितच घडले असेल. कधी कधी तर त्यांनी स्वपक्षालाही धारेवर धरले. माजी आयपीएस अधिकारी असलेल्या के. अन्नामलाई यांनी आपल्या कामातील आक्रमकतेमुळे राज्यात पक्षाची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडले. तरीही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना अन्नामलाई यांची ही रणनीती योग्य वाटत नाही. तामिळनाडूसारख्या राज्यात संवेदनशीलता आणि समतोल राखून काही जबाबदाऱ्या पार पडणे उचित आहे, असे ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तामिळनाडूमध्ये ताज्या प्रकरणात अन्नामलाई यांच्यावर सत्ताधारी द्रमुक पक्षाने ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. अन्नामलाई यांनी द्रमुकच्या विरोधात भ्रष्टाचाराची एक यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्यावर हा दावा ठोकण्यात आला. एवढेच नाही तर अन्नमलाई हे भाजपाचा मित्रपक्ष राहिलेल्या अण्णा द्रमुक (AIADMK) पक्षावरही उखडलेले आहेत. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून त्यांनी अण्णा द्रमुक पक्षासोबतची युती तोडून टाकावी, असे आवाहन केले आहे. ३९ वर्षीय अन्नामलाई यांनी माध्यमांसमोरच भाजपाच्याही नेत्यांची खरडपट्टी काढली आहे, ज्यामुळे मागच्या काही दिवसांत पक्षातील नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन अण्णा द्रमुक पक्षात प्रवेश केला.

भाजपा स्वतःला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणवून घेतो. देशातील प्रत्येक राज्यात भाजपाची संघटना आहे. मात्र तामिळनाडूमध्ये भाजपाला फार लोकप्रियता अद्याप मिळालेली नाही. अन्नामलाई यांच्या हातात नेतृत्व देऊन भाजपाने राज्याच्या राजकारणात एक प्रकारे प्रयोगच केला होता. असा प्रयोग ऑगस्ट २०१४ रोजी तमिलीसई सौंदराराजन यांच्या हातात महिलांच्या संघटनेचे नेतृत्व देऊन केला होता.

हे वाचा >> Rafale Watch : तामिळनाडूत भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या महागड्या ‘राफेल’ घड्याळावरून वादंग

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना तामिळनाडूतील भाजपा नेत्यांनी मागे सांगितले होते की, अन्नामलाई हे प्रोफाइल नसलेले नेते आहेत. पोलीस सेवेत असताना अन्नामलाई यांची लोकप्रियता होती. त्याच आधारे त्यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, तामिळनाडूसारख्या राज्यात नेतृत्वाची धुरा द्यायची असेल तर किमान दहा वर्षं संघटनेत जमिनीस्तरावर काम केलेल्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपविली पाहिजे. पण दुर्दैवाने अन्नामलाई हे या निकषात बसत नाहीत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी अन्नामलाई यांना कर्नाटकहून राजकारणात लाँच केले आणि भाजपाचे प्रमुख म्हणून तामिळनाडूत पाठविले.

अन्नामलाई यांच्यासोबत सूत जुळत नसलेल्या आणखी एका नेत्याने सांगितले की, राज्य पातळीवरील नेतृत्वामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. तामिळनाडूमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, अन्नामलाई उत्साही कार्यकर्ता आहे, त्याचे अज्ञान आणि अपरिपक्व वर्तन यामुळे समस्या निर्माण होतात. अन्नामलाईने वरिष्ठ पत्रकारांना मंदिर किंवा चर्चमध्ये जातात का, अशी विचारणा केली होती. तसेच त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहितीदेखील संघाच्या नेत्याने दिली.

हे वाचा >> ऑनलाइन जुगारावर तामिळनाडू निर्बंध लादणार; ऑनलाइन गेमिंगवरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने का आले?

अन्नामलाई यांच्या स्वभावाविषयी माहिती देताना मद्रास विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे माजी प्राध्यापक रामू मनिवन्नन म्हणाले की, अन्नमलाई हे बदलत्या राजकारणाचे प्रतिबिंब आहे. जर माध्यमे व्यवस्थित हाताळली तर आपण लोकांनाही व्यवस्थित हाताळू शकतो, असा नव्या पिढीचा समज आहे. पण चूक इथेच होते, कारण सर्वसामान्य माणसे ही माध्यमांनाच मूर्खात काढत असतात. आयपीएस असल्याचा शिक्का, तरुण वय या सर्व गोष्टींमुळे अन्नामलाई लोकप्रिय घटक किंवा सेलेबल कमोडिटी (saleable commodity) असू शकतो. पण याचा अर्थ अन्नामलाई विरोधी पक्षाची जागा भरून काढू शकतो, असा अंदाज काढणे अयोग्य ठरेल.

अण्णा द्रमुक पक्षासोबत अन्नामलाई यांना फारकत का घ्यायची आहे? हे कोडे राज्यातील इतर भाजपा नेत्यांनाही पडले आहे. अन्नामलाई यांनी ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाला भ्रष्टाचारी आणि मतदारांना पैसे देणारा पक्ष असल्याचे म्हटले आहे. अशा पक्षासोबत युती करण्यासाठी मी राजकारणात उतरलो नाही, असा इशारा देऊन अन्नामलाई यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे.

भाजपाला २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतील राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी अण्णा द्रमुकसारख्या पक्षांची सोबत भाजपाला उपयोगी पडणार आहे. विशेषतः जयललिता आजारी असताना आणि त्यांच्या निधनानंतर भाजपाने अण्णा द्रमुक पक्षाशी जवळीक साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे अण्णा द्रमुकशी सहजासहजी काडीमोड घेणे भाजपाला शक्य नाही. अन्नामलाई यांना दिल्लीश्वरांनी एवढे मोकळे रान कसे काय दिले? याचे आश्चर्य तामिळनाडूमधील भाजपाची काही वरिष्ठ नेतेमंडळी व्यक्त करतात. जर त्यांच्या जागी दुसरा नेता असता तर तात्काळ दिल्लीतून फर्मान आले असते, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या एका जिल्हाध्यक्षाने दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil nadu politics state bjp chief k annamalai a loose cannon or secret weapon what other leaders says kvg
Show comments