तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना असभ्य प्रश्न विचारल्यामुळे सध्या संसदेची नीतिमत्ता समिती चर्चेच आहे. या समितीचे अध्यक्ष असलेल्या खासदार विनोद सोनकर यांच्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी अनेक आरोप लावले. तसेच त्यांनी खासदारांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप केला गेला. जे लोक भाजपा खासदार विनोद सोनकर यांना ओळखतात, त्यांना हे ठाऊक आहे की, आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सोनकर वादापासून लांब राहिले आहेत. मात्र महुआ मोइत्रा यांच्या आरोपानंतर आता सोनकर केंद्रस्थानी आले आहेत.
उत्तर प्रदेशमधील कौशंबी या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि संसदेच्या नीतिमत्ता समितीचे अध्यक्ष असलेल्या विनोद सोनकर यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, त्यांनी महुआ मोइत्रा यांना विचारलेले प्रश्न हे कॅश फॉर क्वेरी प्रकरणाशी संबंधित होते. मात्र मोइत्रा यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. शुक्रवारी (दि. ३ नोव्हेंबर) एक्स या साईटवर पोस्ट लिहून सोकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, श्रीमती महुआ मोइत्रा यांनी नीतिमत्ता समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेची जाहीर वाच्यता केली, जे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी ससंदीय कार्यप्रणालीचे उल्लंघन केले आहे.
सोनकर यांच्या मतदारसंघापासून अवघ्या ५० किमी अंतरावर असलेल्या प्रयागराजमधील भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ साली निवडणुकीत उतरेपर्यंत ५३ वर्षीय दलित नेते सोनकर हे स्वतःचा व्यवसाय चालवत होते. भाजपात येण्यापूर्वी ते बहुजन समाज पक्षात होते, मात्र त्यांना निवडणुकीसाठी तिकीट मिळाले नाही. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले, “त्यांच्यावर काही खटले चालू होते, पण त्याबद्दल त्यांना कधीही जाहीरपणे बोलताना किंवा प्रतिक्रिया देताना आम्ही पाहिले नाही. आमच्या माहितीनुसार ते अतिशय नम्र व्यक्ती आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी आपल्या व्यवसायातून संपत्ती गोळा केली. या प्रदेशात सोनकर यांच्या जातसमूहाचे (अनुसूचित जाती) मोठे प्राबल्य आहे.”
२०१४ साली सोनकर यांनी भाजपाला कौशंबीमधून विजय प्राप्त करून दिला, त्याआधीच्या निवडणुकीत भाजपा या मतदारसंघात चौथ्या क्रमाकांवर होता. सोनकर यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार तत्कालीन खासदार शैलेंद्र कुमार यांचा ४० हजार मतांनी पराभव केला. डिसेंबर २०१६ रोजी त्यांना पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर घेण्यात आले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी सोनकर यांना भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले. ज्यामुळे उत्तर प्रदेशमधील दलित समाजात वेगळा संदेश दिला गेला.
२०१९ साली भाजपाने कौशंबीमधून पुन्हा एकदा सोनकर यांनाच उमेदवारी दिली. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार इंद्रजीत सरोज यांचा ४१ हजार मतांनी पराभव केला. इंद्रजीत सरोज हे एकेकाळी सोनकर यांच्यासर बसपामध्ये काम करत होते. २०१९ साली खासदार झाल्यानंतर त्याच वर्षी त्यांची संसदेच्या नीतिमत्ता समितीवर नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर सोनकर यांना राष्ट्रीय सचिवपदी बढती देण्यात आली, तसेच त्रिपुरा राज्याचे प्रभारीपदही देण्यात आले. मात्र याचवर्षी संघटनात्मक फेररचना करत असताना त्यांना या पदावरून मुक्त करण्यात आले. २०२२ साली झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कौशंबी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पाचही विधानसभेत भाजपाचा पराभव झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा, अशी चर्चा आहे.