सांगली : आर.आर. आबांमुळे राज्यभर गाजलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत यंदा आबांचे चिरंजीव रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. ही निवडणूक पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत असली तरी राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठेचीही ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तासगावमधून महाविकास आघाडीतून आबांचे वारसदार दहा वर्षांपूर्वी निश्चित झाले होते. मध्यंतरीच्या काळात रोहित यांचे वय कमी होते म्हणून आबांच्या पत्नी सुमनताई पाटील या सलग दोन वेळा रणमैदानात उतरल्या होत्या. आता रोहित यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर अंजनीच्या आबा गटाने वरिष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निष्ठा कायम ठेवली आहे.

आबा गटाची सूत्रे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याकडे प्रामुख्याने असली तरी चेहरा मात्र युवा नेत्याचा आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीतून ही जागा भाजपलाच मिळेल, अशी अटकळ असताना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिळाली. केवळ जागाच नव्हे तर भाजपने माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या हाती ‘घड्याळ’ही बांधले. दोन पाटलांच्या राजकीय लढाईमध्ये कवठेमहांकाळचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी आपली ताकद माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या बाजूने लावली आहे.

हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संजयकाकांना ९ हजार ४११ मते मिळाली. लोकसभेतील पराभवामुळे काकांनी मागील निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करत गेल्या दहा वर्षांपासून राजकीय विरोधक असलेल्या घोरपडेंशी जमवून घेत बेरजेचे राजकारण केले आहे. तर रोहित हा तरुणांना आशादायक चेहरा जसा वाटत आहे तसाच आबांचा वारसाही त्यांना लाभला आहे. यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार आहे.

निर्णायक मुद्दे

● मतदारसंघात आतापर्यंत आबा आणि काका यांची राजकीय ताकद काठावरच राहिली आहे. महायुतीने आतापर्यंतच्या निवडणुकीतील ‘घड्याळ’ या चिन्हाचा राजकीय लाभ उठविण्यासाठी ही जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रोहित पाटील यांच्या नामसाधर्म्याचा फायदाही उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

● माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्याच्या बोलीवर राजकीय साटेलोटे झाले आहे. एका मतावर दोन आमदार अशी घोषणा देऊन मते वळविण्याचा रोहित विरोधकांचा प्रयत्न आहे. एमआयडीसी, पाणी प्रश्न, दुष्काळ आणि द्राक्षाला मिळत असलेले मूल्य यावरच प्रचाराचा भर आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tasgaon kavathe mahankal assembly constituency rohit patil vs sanjay kaka patil maharashtra assembly elections 2024 print politics news zws