मुंबई : अजित पवार यांनी पुढाकार घेऊन तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजय पाटील आणि माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्यात समेट घडवून आणला आहे. पवारांच्या या खेळीमुळे दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पाटील गेल्या तीन – चार वर्षांपासून विधानसभेची तयारी करीत आहेत. रोहित पाटील यांचा जनसंपर्क चांगला तसचे प्रबळ विरोधक नसल्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रोहित पाटील यांच्यासाठी काहिशी सोपी जाईल, असे वाटत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीमुळे रोहित पाटील यांची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणे निश्चित आहे. दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वाट्याला गेली आहे. अजित पवारांनी ही जागा निवडून आणण्याचा चंग बांधला असून, ते भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांना ते निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत.

हेही वाचा : घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष

रोहित पाटील यांचे पारडे काहिसे जड दिसत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपचे उमेदवार असलेले संजय पाटील पिछाडीवर होते. त्यामुळेच अजित पवार यांनी पुढाकार घेऊन माजी आमदार अजितराव घोरपडे आणि संजय पाटील यांच्यातील वाद मिटवून समेट घडवून आणला आहे. घोरपडे – पाटील यांच्यात झालेल्या समेटामुळे रोहित पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. प्रारंभी रोहित पाटील यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक आता चुरशीची होणार आहे.

तासगाव – कवठेमहांकाळवर आर. आर. पाटील कुटुंबाचे वर्चस्व

तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर दिवंगत आर. आर. पाटील कुटुंबियांचे १९९० पासून वर्चस्व आहे. आर. आर. पाटील यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ ची निवडणूक जिंकली होती. मतदारसंघांच्या फेररचनेनंतर तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१४ ची निवडणूकही पाटील यांनी जिंकली होती. त्यांच्या निधनांतर झालेली पोटनिवडणूक आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी जिंकली होती. त्यामुळे या मतदारसंघात रोहित पाटील यांचा पराभव करून विजय खेचून आणणे प्रभाकर पाटील यांच्यासाठी फारसे सोपे असणार नाही. आर. आर. पाटील – संजय पाटील यांच्यातील चुरशीच्या लढती राज्याने पाहिल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पुढच्या पिढीचा संघर्ष दिसून येणार आहे.

हेही वाचा : पहिल्याच दिवशीच्या अर्ज विक्रीतून विदर्भात हरियाणा पॅटर्नचे संकेत, ६२ जागांसाठी २ हजारांवर अर्ज विक्री

नेत्यांमध्ये समेट, कार्यकर्त्यांची एकजुट होणार ?

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले संजय पाटील यांच्या विरोधात अजितराव घोरपडे यांनी खासदार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. जाहीर सभांमधून जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले होते. संजय पाटील ही जिल्ह्याला लागलेली कीड आहे, अशी जहरी टिका करणारे अजितराव घोरपडे आता विधानसभा निवडणुकीत त्याच संजय पाटील यांच्या मुलाचा प्रचार करणार आहेत. वरिष्ठ पातळीवरील तडजोडीतून समेट झाला खरा. पण, नेत्यांमध्ये झालेले मनोमिलन कार्यकर्त्यांच्या पचनी पडेल का ? कार्यकर्ते एकजुटीने काम करणार आहे ? हे लवकरच दिसून येणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tasgaon kavathe mahankal assembly constituency rr patil s son rohit patil vs prabhakar patil print politics news css
Show comments