सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : महाविकास आघाडी सरकार असताना टाटा-एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रात नागपूरमध्ये मिहान येथे उभारण्याबाबत ठरले होते. फॉक्सकॉनप्रमाणे हा हा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या प्रकल्पांच्या या पळवापळवीबाबत केंद्र सरकारकडे दाद मागण्याचे धाडस राज्यातील शिंदे फडणवीस सरकार दाखवणार का? असा सवाल माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. हे सरकार आल्यापासून गेल्या तीन महिन्यांत हा तिसरा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका ही देसाई यांनी केली.

टाटा -एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याबाबत महाविकास आघाडी सरकार असताना चर्चा झाली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टाटा समूहाचे प्रमुख चंद्रशेखरन यांच्यात वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाली होती. नंतर नागपूर जवळील मिहान येथे हा प्रकल्प उभारण्याबाबत त्यांनी पसंतीही कळवली होती. या प्रकल्पाबरोबरच आणखी काही प्रकल्पांबद्दल सह्याद्री अतिथीगृहावर पुन्हा बैठक झाली होती, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

हेही वाचा : बच्‍चू कडू, रवी राणांमध्‍ये संघर्षाची ठिणगी नेमकी केव्‍हा पडली ?

मात्र आता हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे जाहीर झाले आहे. महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून गेल्या तीन महिन्यांतच हा तिसरा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेला हा नेमका कसला योगायोग आहे? आणि हे तिन्ही प्रकल्प नेमके गुजरातला गेले हा काय योगायोग आहे? असा सवाल माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला. महाराष्ट्राचे प्रकल्प असे दुसरीकडे नेले जात असताना शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी केंद्र सरकारकडे दात मागण्याचे धाडस दाखवणार का? असा सवाल देसाई यांनी केला. तसेच राजकीय नेत्यांना दाद मागणे शक्य नसेल तर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, औद्योगिक संघटना यांना दिल्लीला पाठवून महाराष्ट्रातील उद्योगाबाबत दाद मागितली पाहिजे अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली.

Story img Loader