आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जन सेना पार्टी (जेएसपी) या दोन पक्षांची युती काही दिवसांपूर्वी झाली. सोमवारी (२३ ऑक्टोबर) या दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची पहिलीच संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी मिळून आगामी काळात १०० दिवसांचा संयुक्त प्रचार कार्यक्रम निश्चित केला आहे. या १०० दिवसांत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जनतेत जाऊन वायएसआर काँग्रेस हा पक्ष आंध्र प्रदेशच्या अधोगतीस कसा कारणीभूत आहे? याबाबत सांगणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या युतीमध्ये भाजपाचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अद्याप भाजपाने या प्रयत्नांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
बैठकीत आगामी रणनीतीवर चर्चा
ही बैठक संपल्यानंतर अभिनेता असलेले आणि आता राजकारणात उतरलेले जेएसपी पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, दोन्ही पक्षांची राजमुंद्री येथे एक बैठक पार पडली. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा टीडीपीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू याच ठिकाणी तुरुंगात आहेत. टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी अधिक ऊर्जेने लढावे, हा संदेश देण्यासाठी ही बैठक राजमुंद्री येथे घेण्यात आली. दोन्ही पक्षांत आगामी रणनीतीबद्दल चर्चा झाली. आगामी काळात जगन मोहन रेड्डी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली.
टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश नायडू यांनीदेखील जगन मोहन रेड्डी सरकारवर टीका केली. “सध्या राज्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्गातील लोकांचा आवाज दाबला जात आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना धमकी दिली जात आहे,” असे नायडू म्हणाले.
दोन्ही पक्ष एकत्र येऊन सभा घेणार
टीडीपी आणि जेएसपी पक्षांच्या संयुक्त बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. येत्या २९ ते ३१ ऑक्टोबर या काळात हे दोन्ही पक्ष प्रत्येक जिल्ह्यात जाहीर सभा घेतील. तसेच १ नोव्हेंबरपासून दोन्ही पक्षाचे नेते संयुक्तपणे घरोघरी जाऊन जाहीरनाम्यात काय आश्वासनं असावीत, याबाबत लोकांच्या भावना जाणून घेतील. जेडीएस-जेएसपी पक्षाची जिल्हास्तरावर समन्वय समिती स्थापन करण्याचीही योजना या दोन्ही पक्षांची आहे. या बैठकीला टीडीपी पक्षाचे आंध्रप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष के अत्चेनायडू तसेच यानामाला रामकृष्णाडू, पी केशव, पी सत्यनारायण, टी सौम्या आणि निम्मला रामा नायडू आदी नेते उपस्थित होते. तर जन सेना पार्टीचे नदेंदला मनोहर, के दुर्गेश, बी नायकर, व्ही महेंद्र रेड्डी आणि पी याशविनी आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.
२०१८ साली टीडीपी एनडीएतून बाहेर
टीडीपी पक्ष याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचा भाग होता. मात्र, २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षाने २०१८ साली एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. केंद्रात सध्या भाजपाची सत्ता आहे. मात्र, अजूनही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला नाही. आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप त्यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.
सुरुवातीला भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मात्र…
पवन कल्याण हे टीडीपी, जेएसपी यांच्या युतीत भाजपाने यावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यास वायएसआरसीपी पक्षाविरोधात लढणे सोपे होईल, असे पवन कल्याण यांना वाटते. पवन कल्याण यांनी भाजपाला युतीत सामील होण्याचे आवाहन केल्यानंतर भाजपाने सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, अद्याप भाजपा एका ठोस निर्णयापर्यंत आलेली नाही. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत वायएसआरसीपी पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला होता, तर टीडीपी पक्षाला फक्त २३ जागांवर विजय मिळवता आला होता. टीडीपीला एकूण ३९ टक्के मते मिळाली होती, तर जेएसपी पक्षाचा एका जागेवर विजय झाला होता. या पक्षाला ५.५४ टक्के मते मिळाली होती.