Assam Row: बदलापूर येथे दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मंगळवारी (२० ऑगस्ट) बदलापूर येथे मोठे आंदोलन उभे राहिले. काहीशी अशीच परिस्थिती आसाममधील शिवसागर शहरात पाहायला मिळाली. याठिकाणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यामुळे मोठा संघर्ष निर्माण झाला. मुलीचा विनयभंग करणारा आरोपी हा मारवाडी समाजातील असल्यामुळे शहरात बाहेरचे विरुद्ध आसामी असा संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले. आसामच्या उल्फा ULFA (I) या अतिरेकी संघटनेने मारवाडी समाज बाहेरचा असल्याचे सांगून त्यांच्याविरोधात आंदोलन छेडले. त्यानंतर मारवाडी समाजाने कॅबिनेट मंत्र्यासमोर गुडघे टेकून माफी मागितली.
सदर प्रकरण १३ ऑगस्ट रोजी घडले. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. दोन्ही आरोपी हे स्थानिक व्यापारी समुदायाचे असल्यामुळे या घटनेचे पडसाद स्थानिक विरूद्ध बाहेरचे अशा स्वरुपात पाहायला मिळाले. शहरात बहुतेक दुकाने ही मारवाडी समाजाची आहेत. त्याचाही राग यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला. आसामी राष्ट्रवादी संघटनेच्या ३० कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केल्यामुळे बिगर आसामी व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली.
हे वाचा >> “मोदीशहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका!”, मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन
या आंदोलनानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसागर जिल्ह्याचे पालकमंत्री रनोज पेगू यांनी आसामीस राष्ट्रवादी संघटना आणि मारवाडी समूहाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मारवाडी समाजाचे पुरूष आणि महिलांनी गुडघ्यावर बसून कॅबिनेट मंत्री पेगू, जिल्हा प्रशासन आणि आंदोलनकारी संघटनेची यांची माफी मागितली. तसेच माध्यमांसमोर जाहीर दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर आंदोलकांना पान खायला देऊन प्रकरण मिटवले.
आसामी संघटनेकडून तीन मागण्या
या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सदस्यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, आसामीस राष्ट्रवादी संघटनेकडून तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. पहिली मागणी म्हणजे, जिल्ह्यातील जमीन स्थानिकांशिवाय इतर कुणाला विकता येणार नाही, असा कायदा करावा. तसेच दुसरी मागणी म्हणजे, बिगर आसामी व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांच्या पाट्यावर आसामी भाषेत मोठ्या अक्षरात नाव लिहावे. तिसरी मागणी म्हणजे, बिगर आसामी व्यावसायिकांच्या उद्योगात ९० टक्के रोजगार स्थानिक युवकांना दिला पाहिजे.
मारवाडी समाजाचे प्रतिनिधी विनोद अग्रवाल यांनी म्हटले की, आम्ही आसामी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. “आमचे प्रकरण आता मिटले आहे. मारवाडी समाजाने या घटनेचा निषेध केला असून पुन्हा या घटना घडणार नाहीत, असा शब्द दिला आहे. तसेच पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच आम्ही त्यांच्या मागण्याही मान्य केल्या आहेत”, असेही विनोद अग्रवाल म्हणाले. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> “डॉ. संदीप घोष बेवारस मृतदेह विकायचे, आणि..” आर. जी. कर रुग्णालयातील माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप
कॅबिनेट मंत्री पेगू यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, आसामी संघटनेने जमीन, रोजगार आणि स्थानिक भाषेच्या हक्कासंदर्भात काही मागण्या आमच्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सर्मा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन समाजामध्ये निर्माण झालेला विसंवाद आता दूर करण्यात आला आहे.
शिवसागरचे आमदार अखिल गोगाई यांनी मात्र आसामी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. जर आसाममध्येच आसामी लोक सुरक्षित नसतील तर आम्ही जायचे कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अखिल गोगाई यांचा पक्ष राज्यातील विरोधी पक्ष आहे.