यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला फार काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. खरे तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड या पक्षाने ऐन वेळी इंडिया आघाडीमधून बाहेर पडत एनडीए आघाडीत जाणे पसंत केल्यानंतर त्यांच्याविरोधात बराचसा रोष दिसून येत होता. मात्र, तरीही बिहारमधील इतर सर्व पक्षांमध्ये सर्वाधिक मतटक्का मिळवूनही फक्त चार जागांवर विजय मिळविण्यात राजदला यश आले आहे. दुसऱ्या बाजूला बिहारमधील एकूण राजकारण आता पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण- बिहारच्या राजकारणामध्ये निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखाली एक नवा पक्ष उदयास येतो आहे. एकीकडे, एनडीए आघाडी आणि दुसऱ्या बाजूला जनसुराज पार्टी या नव्या पक्षाचे आव्हान या पार्श्वभूमीवर आता राजदचे नेते तेजस्वी यादवदेखील अंग झटकून कामाला लागले आहेत. १५ ऑगस्टनंतर तेजस्वी यादव संपूर्ण बिहारची पदभ्रमंती करणारी यात्रा काढणार आहेत.
हेही वाचा : मुंबईतून ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा लाख अर्ज; प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश
पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीपर्यंत यात्रेची लोकप्रियता टिकून राहावी यासाठी तेजस्वी यादव यांनी आपल्या यात्रेचे विविध टप्पे केले आहेत. राजदचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध कुमार मेहता यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले, “तेजस्वी यादव यांच्या यात्रेदरम्यान, ते बिहारशी संबंधित विविध मुद्द्यांवर बोलणार आहेत. त्यामध्ये ते बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सत्तेत सहभागी असलेल्या नितीश कुमारांना केंद्र सरकारवर पुरेसा दबाव टाकता येत नाही इथपासून ते राज्यघटनेच्या नवव्या अनुसूचीमधील बिहार सरकारचा कोटा वाढवणे आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेला सुधारण्याबाबतच्या मुद्द्यांवर ते लोकांशी संवाद साधतील.”
राज्यातील सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, पाटणा उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवला होता. पाटणा उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती; मात्र ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. तेजस्वी यादव या यात्रेमागचा उद्देश काहीही सांगत असले तरीही निवडणूक रणनीतीकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांची दोन वर्षांपासून सुरू असलेली पदयात्रा आणि तिचा वाढता प्रभाव राज्यावर पडू नये आणि राज्याच्या राजकारणात नवा राजकीय खेळाडू येईल याची धास्ती त्यांना वाटत आहे. राजद पक्षामधील सूत्रांनी सांगितले की, प्रशांत किशोर यांच्यासारख्या नव्या राजकीय खेळाडूने कोणताही राजकीय फायदा घेऊ नये यासाठीच ही यात्रा काढण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावलेली नव्हती. खरे तर या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची मोठी संधी त्यांनी का गमावली, या प्रश्नावर मेहता म्हणाले, “तेजस्वी यादव यांच्या अनुपस्थितीबाबत एवढा विचार करण्याची गरज नाही. काही वैयक्तिक कारणास्तव ते गैरहजर राहिले असतील. बरेचदा मुख्यमंत्री नितीश कुमारदेखील सभागृहामध्ये अनुपस्थित असतात.” राजदचे प्रवक्ते सुबोध कुमार मेहता यांनीही प्रशांत किशोर आणि त्यांचा वाढता प्रभाव हा मुद्दा फार महत्त्वाचा नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “ते जवळपास दोन वर्षांपासून बिहारच्या राजकीय मैदानात आहेत. आम्हाला त्यांच्याबाबत काहीही बोलायचे नाही. त्याऐवजी आम्ही बिहारच्या तरुणांना रोजगार कसा मिळेल आणि बिहारचा सर्वसमावेशक आर्थिक विकास कसा होईल, अशा मुख्य मुद्द्यांवर अधिक लक्ष देऊ इच्छितो. “
दुसऱ्या बाजूला प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. २ ऑक्टोबर रोजी ‘जनसुराज पार्टी’ हा नवा राजकीय पक्ष अस्तित्वात येणार असून, विधानसभेची आगामी निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही किशोर यांनी केली आहे. ते दोन वर्षांपासून बिहारमधील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन जनसुराज यात्रेचा प्रचार करीत आहेत. प्रशांत किशोर यांनी राजदच्या या प्रस्तावित यात्रेवर थेट टीका केलेली नसली तरीही आपल्या जनसुराज यात्रेदरम्यान त्यांनी वारंवार जेडीयू आणि राजदवर निशाणा साधला आहे. त्यांनी अलीकडेच म्हटले आहे, “ज्या व्यक्तीने (तेजस्वी यादव) फक्त इयत्ता नववीपर्यंतचेच शिक्षण घेतले आहे, ती राज्याचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहे; तर दुसऱ्या बाजूला बिहारमधील अनेक पदवीधर तरुणांना शिपायाचीही नोकरी मिळत नाही”
हेही वाचा :“स्वातंत्र्यसैनिकांची जमीन मंत्री सत्तार यांनी बळकावली”, भाजपचे रावसाहेब दानवे यांचा आरोप
लोकसभा निवडणुकीमध्ये राजदला बिहारमधील ४० लोकसभा जागांपैकी फक्त चार जागांवर यश मिळवता आले असले तरीही इंडिया आघाडीने एकूण नऊ जागांवर विजय मिळवला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीशी तुलना करता, राजदचा मतटक्काही लक्षणीयरीत्या वाढला आहे. राजदला या लोकसभा निवडणुकीमध्ये २२.१४ टक्के मते मिळाली असून, इतर सर्व पक्षांमध्ये हा मतटक्का सर्वाधिक आहे. भाजपा आणि जेडीयू या दोन पक्षांना राज्यामध्ये अनुक्रमे २०.५ टक्के आणि १८.५२ टक्के मते मिळाली आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपाने तेजस्वी यादव यांच्या या प्रस्तावित यात्रेवर टीका केली आहे. तेजस्वी यादव यांची ही यात्रा म्हणजे ‘सेल्फ प्रमोशन एक्सरसाईज’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी म्हटले आहे, “विधानसभा मतदारसंघानुसार जर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले, तर असे लक्षात येते की, २४३ विधानसभा जागांपैकी १७४ जागांवर एनडीए आघाडी इंडिया आघाडीपेक्षा पुढे आहे. तेजस्वी यांच्या राजद पक्षाचा जनाधार घसरतो आहे. आम्हाला त्यांच्या यात्रेबाबत काहीही चिंता वाटत नाही. कारण- राजदच्या नेतृत्वाला स्वत:चा प्रचार करण्याची गरज भासते आहे. त्यांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा विधानसभेमध्ये अधिक हस्तक्षेप केला, तर लोकांना ते अधिक पटेल.” दुसऱ्या बाजूला जेडीयूचे प्रवक्ते व विधान परिषदेचे आमदार नीरज कुमार यांनी म्हटले, “राजकीयदृष्ट्या आपले अस्तित्व टिकून राहावे यासाठी तेजस्वी धडपड करताना दिसत आहेत.”