काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत. आपल्या यात्रेदरम्यान ते वेगवेगळ्या भागांना भेट देत आहेत. तसेच भाषण, सभांच्या माध्यमांतून जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या संयुक्त जनता दल (जदयू) आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) या दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनी या राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याची तयारी दाखवली आहे.
तेजस्वी यादव, नितीश कुमार सहभागी होणार
येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारच्या पूर्णिया या भागात दाखल होणार आहे. यावेळी जदयूचे प्रमुख नितीश कुमार आणि राजदचे नेते तथा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या यात्रेत सहभागी होणार आहेत.
२९ जानेवारीला यात्रा बिहारमध्ये दाखल
तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रेमचंद्र मिश्रा यांनी दिली. “राहुल गांधी यांची यात्रा २९ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमधून बिहारमध्ये प्रवेश करेल. २९ जानेवारी रोजी ही यात्रा किशनगंजला असेल. त्यानंतर २० जानेवारी रोजी ही यात्रा पूर्णिया येथे येई. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या यात्रेत सहभागी होतील,” असे मिश्रा यांनी सांगितले.
सीमांचल प्रदेशावर काँग्रेसचे लक्ष
राहुल गांधी यांची यात्रा बिहारमधील अररिया आणि कटिहार या भागातही जाणार आहे. त्यानंतर ही यात्रा पुन्हा पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. किशनगंज लोकसभा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या महायुतीने ही एकमेव जागा जिंकली होती. काँग्रेसने यावेळी सीमांचल भागावर लक्ष केंद्रित केले आहे. या भागात किशनगंज, अररिया, पूर्णिया, कटिहार हे लोकसभा मतदारसंघ येतात. सध्या पूर्णिया आणि कटिहार या जागा जदयूच्या ताब्यात आहेत. तर अररिया या मतदारसंघाचे खासदार भाजपाचे आहेत.
जागावाटपावरून तणावाची स्थिती
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत काँग्रेस आणि जदयू यांच्यात एकमत होत नाहीये. काँग्रेसला बिहारमध्ये अधिक जागा हव्या आहेत. तर काँग्रेस अवास्तव मागणी करत आहे, अशी जदयूची भूमिका आहे. याच कारणामुळे या दोन्ही पक्षांत सध्या तणावाची स्थिती आहे. असे असताना नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याची तयारी दाखवणे ही फार महत्त्वाची बाब मानली जात आहे. इंडिया आघाडीतील घटकपक्ष एकत्र आहेत, असा संदेश कदाचित यातून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत जदयूच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “आमचा काँग्रेसच्या यात्रेला विरोध नाही. मात्र इंडिया आघाडीची एक यात्रा असावी आशी आमची इच्छा होती. राहुल गांधी यांनी पूर्णिया या मतदारसंघात जनतेला संबोधित करण्याचे ठरवले आहे. नितीश कुमार या सभेला हजेरी लावतील. नितीश कुमार यांची हजेरी म्हणजे विरोधकांच्या एकतेचेच दर्शन असेल,” असे या नेत्याने म्हटले.
राजदच्या नेत्याची प्रतिक्रिया
राजदच्या एका नेत्यानेही यावर प्रतिक्रिया दिली. “उमुख्यमंत्री नितीश कुमार पूर्णिया येथील सभेत उपस्थित राहतील. आम्ही सर्वजण एकत्र आहोत, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया या नेत्याने दिली.