Tejashwi yadav on why Nitish Kumar son should join politics : तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी जनता दल (युनायटेड) पक्षाच्या भविष्यासाठी राजकारणात आले पाहिजे असे विधान केले आहे. “तो आमचा भाऊ आहे. मला वाटते की त्याने शक्य तेवढ्या लवकर राजकारणात प्रवेश केला पाहिजे. नाहीतर शरद यादव यांनी स्थापन केलेला जनता दल (युनायटेड) पक्ष भाजपा संपवून टाकेल,” असे तेजस्वी यादव म्हणाले आहे.
निशांत यादव यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर जनता दल (युनायटेड) पक्षाला वाचवणे शक्य होईल का? या प्रश्नावर बोलताना आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, जनता दल (युनायटेड) वाचेल अशी किमान शक्यता तरी निर्माण होईल. निशांत हे कशा पद्धतीने काम करतील यावर ते अवलंबून असेल. आमच्या पालकांनी आम्हाला जबरदस्ती केली म्हणून नाही तर बिहारच्या लोकांची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची ती गरज होती म्हणून आम्ही राजकारणात आलो.”
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे, तसेच राज्यातील आगामी निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवाव्यात असे वक्तव्य केल्यानंतर निशांत कुमार काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते.
“मी बिहारच्या लोकांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मतदान करण्याचे आवाहन करतो, कारण त्यांनी राज्याच्या विकासासाठी बरेच काही केले आहे. गेल्या वेळी जनतेने ४३ जागा दिल्या. पण लोकांनी निवडणुकीत अधिक जागा दिल्या पाहिजेत जेणेकरून आम्ही विकासाची गती कायम ठेवू शकू,” असे निशांत कुमार म्हणाले होते.
तेजस्वी यादव यांचे ‘आरएसएस’वर आरोप
यापूर्वी तेजस्वी यादव यांनी दावा केला होता की ‘संघी घटक’ निशांत यांचा राजकारणातील प्रवेश रोखण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. त्यांच्या वडिलांशी राजकीय मतभेद असूनही निशांत हे कुटुंबाप्रमाणे आहेत. जर ते पुढे आले तर पक्षाला नामशेष होण्यापासून वाचवता येईल. म्हणूनच भाजपामधील काही जण संघाच्या लोकांच्या मदतीने त्यांचा राजकारणातील प्रवेश रोखण्यासाठी कट रचत आहेत, असे तेजस्वी यादव म्हणाले.
तर तेजस्वी यांचे बंधू आणि बिहारच माजी मंत्री तेज प्रताप यादव यांची देखील निशांत यादव यांनी राकारणात प्रवेश करावा अशी इच्छा आहे. पण त्यांनी नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करू नये असे त्यांना वाटते. “निशांत कुमार यांनी आरजेडी पक्षात प्रवेश करावा” असे तेजप्रताप यापूर्वी म्हणाले आहेत.