तेलंगणासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर येथील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष कामाला लागला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे आगामी काळात संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत, तर दुसरीकडे बीआरएस पक्षाच्या तुलनेत काँग्रेस आणि भाजपा हे पक्ष थोडे मागे राहिले आहेत.
११५ उमेदवारांची बीआरएसकडून घोषणा
बीआरएस पक्षाने २१ ऑगस्ट रोजीच विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. एकूण ११९ जागांपैकी बीआरएसने ११५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तिकीट देऊन नेत्यांना लवकरात लवकर प्रचाराच्या मैदानात उतरता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या १५ ऑक्टोबर रोजी केसीआर हे हैदराबादमधील तेलंगणा भवनात उमेदवारांची एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत सर्व उमेदवारांना पक्षाचा बी-फॉर्म दिला जाणार आहे. याच बैठकीत बीआरएस पक्ष आपला जाहीरनामा सार्वजनिक करणार आहेत. त्यानंतर केसीआर एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
प्रचारात बीआरएस पक्ष आघाडीवर
येत्या १६ ऑक्टोबर रोजी केसीआर हे जनगाव आणि भोंगीर या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी ते सिद्दीपेट आणि सिरसिल्ला या भागात जाहीर सभेला संबोधित करतील. १८ ऑक्टोबर रोजी ते जडचार्ला आणि मेडछाल या मतदारसंघात सभा घेणार आहेत. केसीआर या निवडणुकीत गजवेल आणि कामारेड्डी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत. गजवेल मतदारसंघात सिद्दीपेट आणि मेडक या जिल्ह्यांतील काही भागांचा समावेश होतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विनंती केल्यामुळे मी कामारेड्डी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, असे यापूर्वी केसीआर यांनी सांगितलेले आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी केसीआर हे कामारेड्डी या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसची १७ सप्टेंबर रोजी झाली होती बैठक
काँग्रेस पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र, १७ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. ही बैठक तेलंगणा राज्यातच पार पडली होती. काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर न केल्यामुळे पक्षात प्रचाराच्या दृष्टीने अद्याप शांतता आहे. याबाबत बोलताना “उमेदवारांची यादी जाहीर व्हायला हवी होती. दसऱ्यानंतर ही यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.
सर्व मतदारसंघांत प्रचार सुरू करण्याचा आदेश
काँग्रेस पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार या पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्न करत आहेत. एका जागेसाठी साधारण एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असल्यामुळे काँग्रेससमोर तिकीट वाटपाचे आव्हान आहे. याच कारणामुळे उमेदवारांची घोषणा करण्यास विलंब होत असल्याचे म्हटले जात आहे. १७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाने तेलंगणात प्रचाराचा नारळ फोडला होता. सर्व १९९ मतदारसंघांत प्रचारास सुरुवात करावी, असे सांगण्यात आले होते. मात्र, उमेदवार कोण आहे हे माहीत नसल्यामुळे स्थानिक पातळीवर तेवढ्या क्षमतेने प्रचार केला जात नाहीये.
प्रत्येक मतदारसंघासाठी चार ते पाच उमेदवार
उमेदवारांची यादी जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावर काँग्रेसच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “तेलंगणात प्रत्येक मतदारसंघासाठी साधारण चार ते पाच उमेदवार स्पर्धेत आहेत. यापैकी फक्त एकालाच तिकीट मिळणार आहे. तिकीट मिळणार की नाही, याची कोणतीही कल्पना नसताना नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे”, असे या नेत्याने म्हटले.
काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस
काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसली, तरी या पक्षाच्या आश्वासनांची सगळीकडे चर्चा होत आहे. काँग्रेसने तेलंगणाच्या जनतेला प्रमुख सहा आश्वासनं दिली आहेत. प्रत्येक महिलेला २५०० रुये प्रतिमहिना आर्थिक मदत, ५०० रुपयांना गॅस सिलिंडर, महिलांसाठी मोफत बस प्रवास, प्रत्येक हंगामात शेतकऱ्याला १५ हजार रुपयांपर्यंत मदत, पात्र नागरिकांना दरमहा चार हजार रुपयांचे पेन्शन, राज्यातील प्रत्येक नागरिकाला १० लाख रुपयांपर्यंत आरोग्यविमा आदी आश्वासनं काँग्रेसने दिली आहेत. यासह ज्यांना स्वत:चे घर नाही, अशा लोकांना इंदिराम्मा हाऊसिंग प्रपोजल योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतची मदत; तसेच तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळवून देण्यात ज्यांनी योगदान दिले, त्यांना २५० स्केअर यार्डचे घर अशी काही आश्वासनं काँग्रेसने दिली आहेत.
अमित शाह, नरेंद्र मोदी घेणार सभा
दुसरीकडे भाजपानेदेखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने तेलंगणामध्ये हळद महामंडळाची स्थापना तसेच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. आगामी काळात तेलंगणा राज्यात भाजपाचे नेते अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. भाजपाच्या प्रचाराच्या रणनीतीबाबत तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली. “उमेदवारांची अंतिम यादी अद्याप तयार केली जात आहे. आगामी काही दिवसांत आम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा तसेच आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत”, असे रेड्डी यांनी सांगितले.
तेलंगणात काँग्रेस-बीआरएस-भाजपा अशी लढत
दरम्यान, उमेदवारांची यादी तसेच पक्षाचा जाहीरनामा आतापर्यंत जाहीर व्हायला हवा, असे मत येथील काही भाजपा नेत्यांचे आहे. अशीच प्रतिक्रिया तेलंगणातील भाजपाच्या एका नेत्याने दिली. “कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यानंतर तेलंगणा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ही निवडणूक बीआरएस विरुद्ध भाजपा अशी होईल, असा आमचा अंदाज होता. आता मात्र काँग्रेस, भाजपा आणि बीआरएस या तीन पक्षांत ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने जाहीरनामा आणि उमेदवारांची यादी जाहीर करायला हवी होती”, असे हा नेता म्हणाला.