भारतीय निवडणूक आयोगाने तेलंगणा राज्यासह एकूण ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. तेलंगणात येत्या ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणुकीची घोषणा होताच तेलंगणासह मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पाच राज्यांपैकी तेलंगणा राज्याची विशेष चर्चा होत आहे. कारण येथे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) या विधानसभा निवडणुकीत दोन जागा लढवणार आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे विश्लेषण वेगवेगळ्या अंगाने केले जात आहे.
११५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा
बीआरएस पक्षाने एकूण ११९ जागांपैकी ११५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केलेली आहे. २१ ऑगस्ट रोजी पक्षाने उमेदवारांची ही यादी सार्वजनिक केली होती. हा निर्णय जाहीर करताना केसीआर यांनी ‘मी दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे,’ असे सांगितले होते. ते जगवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सध्या ते गजवेल मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात सिद्दीपेत आणि मेडक या दोन जिल्ह्यांतील काही भाग येतो.
केसीआर दोन जागांवर निवडणूक लढवणार
केसीआर यांच्या दोन जागांवर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. केसीआर हे गजवेल मतदारसंघातून निवडून येण्याबाबत साशंक आहेत. त्यामुळे त्यांनी कामारेड्डी मतदारसंघातूनही लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. २०१४ साली केसीआर यांनी गजवेल मतदारसंघात विजय मिळवला होता. या मतदारसंघात गजवेल, टूपरान, कोंडापाका, जगदेवपूर, वरगल आणि मुलूग हा प्रदेश मोडतो. २०१४ सालच्या निवडणुकीत केसीआर यांनी टीडीपीचे प्रताप रेड्डी वंतेरू यांचा १९३९१ मतांनी पराभव केला होता. २०१८ सालच्या निवडणुकीतही केसीआर यांनी ५८ हजार मतांच्या फरकाने वंतेरू यांचावर विजय मिळवला होता.
गोम्पा गोवर्धन कामारेड्डी मतदारसंघाचे विद्यमान आमदार
बीआरएस पक्षाचे नेते गोम्पा गोवर्धन हे कामारेड्डी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र या निवडणुकीत गोवर्धन निवडून येणार नाहीत, असे बीआरएसला वाटते. याच कारणामुळे कामारेड्डी हा मतदारसंघ हातातून जाऊ नये यासाठी बीआरएस पक्षातर्फे केसीआर येथून निवडणूक लढवणार आहेत, अशा तर्क काही विरोधक बांधत आहेत. गोवर्धन हे कामारेड्डी मतदारसंघातून १९९४ सालापासून सातत्याने निवडून आलेले आहेत. मात्र यावेळी गोवर्धन यांनीच केसीआर यांना कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक लढावी, अशी विनंती केल्याचे म्हटले जात आहे.
कामारेड्डी हाच मतदारसंघ का?
कामारेड्डी मतदारसंघात एकूण २.४ लाख मतदार आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. येथे कापडाचा बाजार, कुक्कुटपालन, शेती आदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. या मतदारसंघात साधारण २० हजार मुस्लीम मते आहेत. ही मते मिळाल्यास या मतदारसंघातून विजय मिळवणे सहज शक्य आहे, असे गणित राजकीय विश्लेषक मांडतात. या मतदारसंघात टीडीपी या पक्षाचे समर्थकही आता भाजपाकडे वळली आहेत. या मतदारसंघात प्राबल्य नसूनही २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १३ हजार ९०० तर २०१८ सालच्या निवडणुकीत १५ हजार ४०० मते मिळाली होती. हा मतदारसंघ तसेच केसीआर यांच्या उमेदवारीबाबत गोवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली. “मी या मतदारसंघात चांगले काम केलेले आहे. येथील मतदार केसीआर यांना पाठिंबा देत आहेत, त्याबद्दल जनतेचे आभार. लोकांना केसीआर यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी पाहायचे आहे,” असे गोवर्धन म्हणाले.
गोवधर्न यांचे मताधिक्य कमी झाले
गोवर्धन यांनी २०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते शब्बीर अली यांना १८ हजारपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले होते. मात्र २०१८ साली विजयी मतांचा हा फरक ५ हजार मतांपर्यंत खाली आला होता. सत्ताविरोधी लाटेचा फटका त्यांना बसला होता.
…तरी माझाच विजय होईल- शब्बीर
केसीआर यांच्या कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे नेते शब्बीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केसीआर यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. गोम्पा गोवर्धन मला पराभूत करू शकत नाहीत, हे समजल्यामुळेच केसीआर यांनी हा निर्णय घेतला आहे. माझ्याविरोधात लढण्याचा निर्णय घेऊन, त्यांनी मुस्लीम नेत्यांसंदर्भात असलेला द्वेष व्यक्त केला आहे. काँग्रेसची सत्ता असताना मुस्लीम समाजाला ४ टक्के आरक्षण मिळावे म्हणून मी प्रयत्न केला होता. मी दोन वेळा निवडून आलेलो आहे. तर एकदा विधानपरिषदेवर जाऊन मी लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केलेल आहे. मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेतादेखील राहिलेलो आहे. माझा कामारेड्डी या मतदारसंघातून विजय निश्चित आहे. मात्र हाच विजय कठीण करण्यासाठी केसीआर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे काहीही फरक पडणार नाही. माझाच विजय होईल,” अशी प्रतिक्रिया शब्बीर यांनी दिली.